बाप-लेकाचा खून; तिघांना अटक

बाप-लेकाचा खून; तिघांना अटक

लोणी कंद पोलिसांची कामगिरी

पुणे (रफिक शेख) : पूर्ववैमनस्यातून बाप-लेकावर धारदार हत्याराने वार करून खून केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात लोणी कंद पोलिसांना यश आले आहे. प्रतीक अनिल कंद (वय २८), आशुतोष नानासाहेब शिंदे आणि नानासाहेब शिंदे (सर्व रा. लोणी कंद) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. प्रथमेश ऊर्फ सनी कुमार शिंदे (वय २२) आणि कुमार मारुती शिंदे (वय ५५, दोघेही रा. शिंदेवस्ती, लोणी कंद) अशी खून झालेल्या बापलेकांची नावे आहेत. ही घटना बुधवारी रात्री सात वाजण्याच्या सुमारास लोणी कंदमध्ये घडली होती. मागील वर्षी फेब्रुवारी महिन्यात सचिन शिंदे तरुणाचा खून झाला होता. यातील आरोपी प्रथमेश ऊर्फ सनी शिंदे याच्यावर गुन्हा दाखल होता.

संबंधित गुन्ह्यात तो तीन महिन्यांपूर्वी जामिनावर बाहेर आला होता. बुधवारी रात्री सातच्या सुमारास प्रथमेश ऊर्फ सनी आणि त्याचे वडील मोटारमधून लोणी कंदमधून शिंदेवस्तीकडे निघाले होते. त्यावेळी दुसऱ्या मोटारीतून आलेल्या प्रतीक कंद, आशुतोष शिंदे आणि नानासाहेब शिंदे या बापलेकाने साथीदारांच्या मदतीने सनीवर धारदार शस्त्रांनी वार केला. या वेळी त्याला वाचविण्यासाठी वडील कुमार शिंदे मध्ये आले. त्या वेळी टोळक्याने त्यांच्यावरही वार केले. या हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला. हल्ल्यानंतर टोळके पसार झाले होते. लोणी कंद पोलिसांनी तपास करून तिघांना अटक केली. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे, सहायक पोलीस निरीक्षक निखिल पवार, पोलीस उपनिरीक्षक सूरज गोरे यांच्या पथकाने केली.

About The Author