तरुणीला पळवून नेणाऱ्या आरोपीला केली अटक
पिंपरी (प्रकाश इगवे) : तरुणीला आणि तिच्या अडीच वर्षाच्या चुलत बहिणीला पळवून नेल्याची घटना मंगळवारी शाहूनगर, चिंचवड येथे घडली होती. या घटनेतील आरोपीला पोलिसांनी शिर्डी येथून अटक केली आहे. विजय नागोराव राजदेव (२२, रा. घोडेगाव गंगापूर, औरंगाबाद) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका २० वर्षीय तरुणीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. १३) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजदेव याने फिर्यादी तरुणीला मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. आपण दोघे पळून जाऊ’, असे म्हटले त्यासाठी तरुणीने नकार दिला. त्यावरून चिडलेल्या आरोपीने ‘नाही आली तर मी तुझ्या भावाला मारून टाकीन, तुझ्या आईवडिलांची गावात बदनामी करीन आणि तुझ्या लग्नाच्या दिवशी तुझे लग्न मोडून टाकीन’, अशी धमकी दिली. मंगळवारी सकाळी ११ वाजता राजदेव याने फिर्यादी आणि त्यांची अडीच वर्षांची चुलत बहीण या दोघींना जबरदस्तीने गाडीत बसून नेले. याबाबत फिर्यादी यांच्या घरच्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी आरोपीचा माग काढत त्याला शिर्डी येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे.