मधुचंद्राच्या रात्री मिलनानंतर तुला ब्लडींग का झाले नाही म्हणून पत्नीचा छळ
पुणे (रफिक शेख) : उच्च शिक्षित आणि अमेरिकास्थित पतीने पत्नीवर लग्नापूर्वी कौमार्यभंगाचा ठपका ठेवून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एका २८ वर्षाच्या विवाहितेने हडपसर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. यावरुन पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार अमेरिकेतील टेक्सास, कर्नाटक आणि फुरसुंगीत जानेवारी ते २६ डिसेंबर २०२१ दरम्यान घडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला उच्चशिक्षित असून, पुण्यातील एका नामांकित कंपनीत काम करते. तिचा पतीही उच्च शिक्षित असून, तो सॉफ्टवेअर अभियंता आहे. सध्या तो अमेरिकेतील टेक्सास येथे काम करत आहे. फिर्यादी यांचा विवाह झाल्यानंतर ते अमेरिकेत गेले. फिर्यादीच्या पतीने मधुचंद्राच्या रात्री मिलनानंतर तुला ब्लडींग का झाले नाही, अशी विचारणा केली. लग्नाच्या अगोदर तुझे कोणाबरोबर शारीरिक संबंध होते का, अशी विचारणा करुन वारंवार भांडणे काढली. त्यानंतर ते कर्नाटकात परत आले. सध्या ते फुरसुंगी येथे राहात आहेत.