70 एकर ऊस जळून खाक
लातूर (प्रतिनिधी) : दि. 30 जानेवारी रोजी दुपारी एक ते दीड च्या सुमारास लातूर तालुक्यातील भिसे वाघोली येथील जवळपास 20 शेतकऱ्यांचा 70 एकर ऊस जळून खाक झाला आहे. अचानक आग लागल्याने दिसल्यामुळे गावकरी तात्काळ जमा झाले. आगीचा वेग इतका होता कि त्याच्यापुढे काहीही करता आले नाही. आणि बघता बघता दहा ते पंधरा मिनिटांमध्ये आगीने जवळपास साठ सत्तर एकर क्षेत्र व्यापून टाकले. परिसरात जिकडे तिकडे आगीचे लोळ दिसत होते.
वाघोली येथील विविध कार्यकारी सोसायटी चे चेअरमन संभाजी वायाळ यांनी मांजरा विकास कारखान्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना फोन करून याची कल्पना दिली असता विकास कारखान्याची अग्निशामक दलाची गाडी तात्काळ हजर झाली. दिलीपराव देशमुख व आमदार धीरज देशमुख यांनी संभाजी वायाळ यांना फोन करून सर्व ऊस तात्काळ नेण्यात येईल असे सांगितले. शेवटी राहिलेला ऊस वीजवण्यासाठी अग्निशामन दलाच्या कर्मचाऱ्यांनी शर्तीचे प्रयत्न करून उर्वरित ऊस वाचवला. तरी संबंधित कारखान्यांनी तात्काळ यंत्रणा राबवून जळालेला ऊस त्वरित न्यावा अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे.