मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या वाहनचालकास कर्नाटक मधून अटक
लातूर : दि. 31 जानेवारी 2022 रोजी सकाळी शिवनी ता.जि. लातूर येथील दत्तात्रय पांचाळ, वय 38 वर्षे व त्यांची मुलगी वय 14 वर्ष यास शाळेत सोडण्याकरिता लातूर कडे येत असताना सकाळी 08:50 वाजण्याच्या सुमारास बाभळगाव रोड, म्हाडा कॉलनीच्या गेट समोरील रोडवर त्यांचे पाठीमागून येणाऱ्या मालवाहू ट्रक हा दत्तात्रय पांचाळ चालवीत असलेल्या मोटरसायकल ला जोराची धडक दिल्याने दत्तात्रय पांचाळ व त्यांची मुलगी हे दोघेही ट्रकच्या खाली येऊन जागेवरच मरण पावले होते अपघात करणारा ट्रक चालक ट्रक सह घटनास्थळावरून लोकांची नजर चुकवून पळून गेला होता.
त्यावरून पोलीस ठाणे विवेकानंद चौक लातूर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. नमूद गुन्ह्यात पळून गेलेल्या मालवाहू ट्रक व चालकाचा शोध घेऊन त्यास गुन्ह्यात अटक करणे बाबत पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे यांनी निर्देशीत केले होते. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री.अनुराग जैन, उपविभागीय पोलिस अधिकारी (लातूर शहर) श्री.जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशन विवेकानंद चौक चे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वात पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून अपघात करून पळून गेलेल्या वाहनाचा व वाहन चालकाचा शोध घेण्यात येत होता.
सदर पोलीस पथकाने घटनास्थळाचे साक्षीदार व शहरा बाहेर जाणाऱ्या विविध रस्त्यावरील उपलब्ध असलेल्या अनेक सीसीटीव्ही फुटेजची तब्बल चार दिवस पाहणी करून मिळालेल्या अनेक सीसीटीव्ही फुटेजचा डाटा एकत्र करून विश्लेषण करण्यात आला. त्या आधारावर अपघात करून पळून गेलेल्या ट्रकचा क्रमांक के.ए. 39_ 5433 असा असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून वरिष्ठांचे मार्गदर्शनात सदर पथक हुमनाबाद जिल्हा बिदर राज्य कर्नाटक येथे जाऊन सदरचा ट्रक व अपघात करून पळून गेलेल्या चालकासह दिनांक 05/02/2022 रोजी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन विवेकानंद चौक येथे दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक. 91/2022 , कलम 304(अ), 279 भादवि व कलम 184 मोटार वाहन कायदा अंतर्गत नमूद वाहन चालक नामे मुनीरोद्दिन खुदबुद्दीन, वय 48 वर्षे, राहणार बसवकल्याण जि.बिदर राज्य कर्नाटक यास अटक करण्यात आले आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस ठाणे विवेकानंद चौक येथील पोलीस उपनिरीक्षक जे.बी.मानूल्ला हे करीत आहेत.