धक्कादायक : पतीचा साथीदारांच्या मदतीने खून; पत्नीसह तिघांना अटक
पिंपरी (रफिक शेख) : छळ करतो म्हणून पत्नीने साथीदारांच्या मदतीने पतीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावली. हा धक्कादायक प्रकार देहूगाव परिसरात उघडकीस आला. ही घटना ३० जानेवारीला रात्री घडली. आकाश अशोक गोरखे, असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पत्नी ज्योती आकाश गोरखे (१९), तिचे साथीदार सोनी उमेश जेगरे (३१), रवि धनू राठोड (२९, रा. देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह अक्षय लोंढे (रा. जाधववाडी, चिखली), राम विजय महोतो (रा. पटणा, बिहार) व आणखी एक जण यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार बळीराम चव्हाण यांनी याप्रकरणी शनिवारी (दि. १२) देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहूरोड पोलीस ठाण्यात आकाश गोरखे
याच्या बेपत्ता होण्याची तक्रार दाखल होती. त्याबाबत देहूरोड पोलीस तपास करीत होते. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली. बेपत्ता असलेल्या आकाश गोरखे याचा त्याच्या पत्नीने साथीदारांच्या मदतीने खून केला असल्याचे समोर आले. आकाश गोरखे हा पत्नी आरोपी ज्योती हिला मारहाण करून छळ करत होता. त्या कारणावरून आरोपी सोनी, ज्योती आणि रवि यांनी आकाश याचा खूनाटा कट रचला.
आरोपी अक्षय, राम आणि साहिल यांनी ३० जानेवारी २०२२ रोजी रात्री ११ वाजता आकाश गोरखे याला देहूगाव कमान येथून अज्ञात ठिकाणी नेले. तिथे आरोपींनी आकाश याला मारहाण करून त्याचा खून केला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावली. बेपत्ता असलेल्या आकाशचा तपास केल्यानंतर पोलिसांना ही धक्कादायक माहिती मिळाली. त्यानंतर आरोपींना अटक केली.