तालुक्यातील हडोळती व १७ गावांसाठी ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ४५ कोटी ३९ लक्ष १६ हजार मंजूर !
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील हडोळती व १७ गावांसाठी ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत ४५ कोटी ३९ लक्ष १६ हजार मंजूर झाले आहेत. या मंजुरीबद्दल राज्य शासनाचे आणि राज्यमंत्री संजयजी बनसोडे यांचे आमदार बाबासाहेब पाटील यांनी आभार व्यक्त केले.
जल जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत ही प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. हडोळती व १७ गावांचा नळ पाणी पुरवठा योजनेचा दरडोई खर्च हा विहीत निकषामध्ये असल्यामुळे व सदर योजनेची ढोबळ किंमत रु. ५.०० कोटी पेक्षा जास्त असल्याने नळ पाणी पुरवठा योजनेस मंजूरी देण्यासाठीचा प्रस्ताव शासनाच्या मान्यतेकरीता सादर करण्यात आला होता. आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. अहमदपूर तालुक्यातील हडोळती व १७ गावांचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार असल्याचे मत यावेळी आमदार श्री बाबसाहेब पाटील यांनी व्यक्त केले.