राज्यातील शेतकरी विरोधी सरकारला पायउतार करा – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

राज्यातील शेतकरी विरोधी सरकारला पायउतार करा - माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : गेल्या अडीच वर्षापासून कोरोनाच्या जागतिक संकटात सापडलेल्या राज्याला शासनाकडे कुठलीही मदत मिळालेली नाही. केंद्रातील मोदी सरकारने कोरोनात 21 लाख कोटीचे पॅकेज जाहीर करून सर्वसामान्य नागरिकांना आधार देण्याचे काम केले. त्यांनी कृषी क्षेत्राला चार लाख कोटी रूपये पायाभूत सुविधासाठी दिले. शेतकर्‍यांसाठी वीस प्रकारच्या योजना लागू केल्या आहेत. लघु उद्योग, छोटे व्यवसायीक व कामगारांसाठी मासिक तीन हजार रूपये पेंन्शन चालु केले. तोच आदर्श कायम ठेवत मध्यप्रदेश तेलंगणा, व दिल्‍ली सरकारनेही कोराना काळात सर्वसामान्याला मदतीचा आधार देण्याचे काम केले. परंतु शेतकर्‍यांचे काहीही देणे-घेणे नाही. अशा अविर्भावात असणार्‍या महाराष्ट्रातील राज्य सरकारने मात्र, शेतकर्‍याला कुठलीही मदत जाहीर न करता. शेतकरी विरोधी निर्णय घेण्याचे काम सुरू केलेले आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी विरोधी सरकारला पायउतार करा असे प्रतिपादन भाजपा नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी ते किसान मोर्चाच्यावतीने हरंगूळ बू व साई येथे आयोजित जनसंवाद अभियानात बोलत होते. हरंगूळ बू येथील कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून बाबूराव वाघमारे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांतराव शेळके, एम.एन.एस.बँकेचे उपाध्यक्ष एस.आर.मोरे, एम.एन.एस.बँकेचे सल्‍लागार संचालक निळकंठराव पवार, जननायकचे रेणापूर तालुकाध्यक्ष प्रतापराव शिंदे, राजाभाऊ मुळे, व्यंकटराव पन्हाळे, किसान मोर्चाचे सौदागर पवार, पंचायत समिती सदस्य अरविंद सूरकुटे, विठ्ठल शेंडगे, गणेश सगर, हणमंत कोतवाड, बालाजी माळी, मनोहर बरूरे, चंद्रकांत खटके, अमर बेंबडे, बळीराम ढमाले यांची उपस्थिती होती. तर साई येथील कार्यक्रमाला अध्यक्ष अमोल पवार हे होते. तसेच महादेव पवार, सिध्देश्‍वर पवार, दयांनद पवार, पतंग पवार, राजाभाऊ वलसे, वामन पवार, महेश पवार, नर्सिंग टेकाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले की, राज्यातील सरकार हे कायम शेतकरी विरोधी काम करीत आहे. सत्तेवर येण्यापूर्वी ना.ठाकरेंनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांला हेक्टरी 50 हजार मदत द्यावी. अशी मागणी केली अन् सत्तेवर येताच शेतकर्‍याला हेक्टरी फक्‍त 10 हजार रूपये काहींना देण्याचे काम केले. सध्या राज्यातील ऊसाला प्रश्‍न गंभीर होत आहे. परंतु याकडे लक्ष द्यायला सत्ताधार्‍याला वेळ नाही. सन 2020-21 मध्ये मांजराने 2300 रूपये भाव दिला. परंतु त्यांच्याकडून शेतकर्‍याचे 475 रूपये येणे बाकी आहे. विकासनेही 2300 भाव दिला. त्यांच्याकडून 400 रूपये येणे बाकी आहे. रेणानेही 2300 रूपये भाव दिला. त्यांच्याकडे 550 रूपये येणे बाकी आहे. या कारखान्यांनी 14 दिवसात पेमेंट देणे गरजेचे आहे. पंरतु यानंतरही शेतकर्‍यांचे पैसे मिळण्यास वेळ झाला तर 15 टक्क्यांनी व्याजासह त्यांना पैसे द्यावे लागतील. त्यामुळे शेतकर्‍यांच्या ऊसाला न्याय द्या अन्यथा येणार्‍या काळात परिणामांना सामोरे जावे लागेल असा इशाराही त्यांनी यावेळी बोलताना दिला. 
कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांचा सत्कार स्थानिक कमिटीच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सगर, महादेव पवार यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अब्दूल गालिब शेख यांनी केले. या कार्यक्रमाला हरंगूळ बू व साई गाव व परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

कारखान्याची दहशत दूर करण्याचे काम करू
लातूर शहर मतदार संघाअंतर्गत येणार्‍या 28 गावातील शेतकर्‍यांच्या ऊसाचा प्रश्‍न गंभीर होत असतानाही याबाबत कोणीही बोलायला तयार नाही. बर्‍याच शेतकर्‍यांना अतिवृष्टीचे अनुदान मिळालेले नाही. 50 टक्के शेतकर्‍याला विमा मिळालेला नाही. ऊसाचे कार्यक्षेत्र सर्वाधिक असताना वीजबील थकबाकीमुळे शेतकर्‍यांचे कनेक्शन कट केले जात आहेत. अनेक शेतकरी सभासद असतानाही त्यांचा ऊस वेळेत नेण्याऐवजी गेटकेनद्वारे परजिल्ह्यातील ऊस घेतला जात आहे. आपला ऊस जाईल की नाही? या भीतीने या सहकार कारखानदाराबाबत बोलत नाहीत. त्यामुळे काही शेतकर्‍यांवर ऊस जाळून टाकण्याची वेळ येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या न्यायासाठी रस्त्यावर उतरूनृ शेतकर्‍यांमध्ये असलेली कारखान्याची दहशत दूर करण्याचे काम करू, असे प्रतिपादन युवा नेते तथा भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केले.

सभासद असूनही ऊस जात नाही मी काय करू?

भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे जनसंवाद अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे प्रश्‍न ऐकून घेवून मार्गी लावण्याचे काम करीत आहेत. साई येथील संवाद अभियानामध्ये संवाद साधत असताना येथील शेतकरी शिवराज पवार म्हणाले की, मी मांजरा साखर कारखान्याचा सभासद आहे. माझा साई शिवारामध्ये सव्वा एकर ऊस आहे. नोंदणी वेळेवर होऊन, ऊसतोडीची तारीख येवूनही चार महिणे झाले. कारखान्याच्या ऊसतोड कामगारांनी अनाधिकृतपणे ऊस तोडणीसाठी 7500 रूपये घेतले तरीही ऊस तोडणी होेत नाही. आता तूम्हीच सांगा मी काय करू? अशी आगतीक भावना त्यांनी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्यासमोर व्यक्‍त केली. दरम्यान त्यांनी त्यांना आधार देऊन न्याय देण्याचे आश्‍वासन दिले.

About The Author