आडवणूकीतून मुक्‍त होण्‍यासाठी हक्‍काचा प्रकल्‍प उभारणार – आ. रमेशआप्पा कराड

आडवणूकीतून मुक्‍त होण्‍यासाठी हक्‍काचा प्रकल्‍प उभारणार - आ. रमेशआप्पा कराड

पहिल्‍याच दिवशी साडेतीन हजार शेतकऱ्यांची ऊस गाळप प्रकल्‍पाच्‍या उभारणीसाठी नोंदणी

लातूर (प्रतिनिधी) : लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रातील ऊस उत्‍पादक शेतकरी आणि कार्यकर्त्‍यांची होणारी आडणूक आणि पिळवणूक यातून मुक्‍त होण्‍यासाठी शेतकऱ्यांच्‍या आग्रहाखातर प्रतिदिन २ हजार मेट्रीक टन ऊस गाळप क्षमतेचा प्रकल्‍प लातूर तालुक्‍यात उभा केला जात असल्‍याची माहिती भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी ऊस उत्‍पादक शेतकरी नोंदणी शुभारंभ प्रसंगी बोलताना दिली. नोंदणीच्‍या पहिल्‍याच दिवशी तब्‍बल साडेतीन हजार शेतकऱ्यांनी प्रकल्‍प उभारणीत योगदान देण्‍यासाठी नोंदणी केली.

मांजरा परिवारातील साखर कारखान्‍याचे शेतकरी सभासद हे मालक असताना प्रस्‍थापितच मालक होवून बसले आहेत. शेतकऱ्यांना न्‍याय देण्‍याची भूमिका घेण्‍याऐवजी कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून लातूर ग्रामीण विधानसभा कार्यक्षेत्रातील बहुसंख्‍य ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांची आणि भाजपाच्‍या कार्यकर्त्‍यांची आडवणूक करून मोठया प्रमाणात पिळवणूक करीत असल्‍याने अनेकजण अडचणीत सापडले आहेत. अशा ऊस उत्‍पादकांना न्‍याय मिळावा यासाठी अनेक शेतकऱ्यांच्‍या आणि कार्यकर्त्‍यांच्‍या आग्रहाखातर भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांनी लातूर तालूक्‍यात प्रतिदिन २ हजार मेट्रीक टन ऊस गाळप करणारा गुळ पावडर व खांडसरी या बरोबरच सहा मेगावॅट वीज निर्मिती करणारा प्रकल्‍प उभा करण्‍याचा निर्णय घेतला.

नियोजित पुर्णब्रम्‍ह योगिनी प्रयाग शुगर्स या प्रकल्‍पाच्‍या उभारणीसाठी ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांच्‍या नोंदणीचा शुभारंभ जेष्‍ठ मार्गदर्शक श्री. तुळशीरामअण्‍णा कराड यांच्‍या हस्‍ते शुक्रवार रोजी झाला. या कार्यक्रमात मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत नामदेव बिडवे रा.पिंपळगाव अंबा, सुधाकरनाना काळे रा. शिराळा, अल्‍काताई जुगल रा. गातेगाव, अंतराम कणसे रा. पोहरेगाव, गुणवंत कारंडे रा. वरवडा या शेतकऱ्यांनी आपली नोंदणी केली. नोंदणीच्‍या पहिल्‍याच दिवशी जवळपास साडेतीन हजार ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांनी नोंदणी केली.

यावेळी भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख, प्रदेश उपाध्‍यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर, प्रगतशील शेतकरी काशीराम कराड, भाजपाचे जिल्‍हा सरचिटणीस संजय दोरवे, विक्रम शिंदे, राजेश कराड, भागवत सोट, अमोल पाटील, त्र्यंबकआबा गुटे, लालासाहेब पाटील, डॉ. बाबसाहेब घुले, गोविंद नरहारे, अनिल भिसे, साहेबराव मुळे, हणमंतबापू नागटिळक, सतिष अंबेकर, विजय काळे, बन्‍सी भिसे, अनंत चव्‍हाण, सुरेंद्र गोडभरले, अॅड.दशरथ सरवदे, सुरज शिंदे, शाम वाघमारे, महेंद्र गोडभरले, राजकिरण साठे, वसंत करमुडे, पदमाकर चिंचोलकर, यांच्‍यासह अनेकांची प्रमुख उपस्थिती होती.

गेल्‍या पंधरा वीस वर्षात माझ्याकडे काहीच नसताना अनेकांनी साथ दिली, माझ्यावर प्रेम केले, माझे मावळे बागायतदार नसतील पण स्‍वाभिमानी आहेत. त्‍यांच्‍या ताकतीवर भल्‍याभल्‍यांना त्‍यांची जागा दाखवून दिली. आज आपल्‍या सर्वांच्‍या आशिर्वादाने पक्षाने मला आमदारकी दिली आहे. या माध्‍यमातून शेतकऱ्यांना न्‍याय देवू शकलो नाही तर त्‍या आमदारकीचा काय उपयोग असे सांगून आ. रमेशअप्‍पा कराड म्‍हणाले की, गोरगरीब आणि सर्वसामान्‍यांच्‍या डोळयातील अश्रू पुसण्‍याचे काम करणार आहे. ऊस उत्‍पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करून नियोजित या गुळपावडर व खांडसरी प्रकल्‍पाच्‍या उभारणीत योगदान द्यावे असे आवाहन केले.

प्रारंभी दिलीपराव देशमुख, विक्रम शिंदे, भागवत सोट, हणमंतबापू नागटिळक, साहेबराव मुळे, सुरज शिंदे, दशरथ सरवदे, पद्माकर चिंचोलकर, रशिद पठाण यांनी आपले मनोगत व्‍यक्‍त करून शेतकऱ्यांच्‍या हितासाठी हा प्रकल्‍प वरदान ठरणार असल्‍याचे सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन चंद्रकांत कातळे यांनी केले तर गोविंद नरहरे यांनी आभार मानले. या कार्यक्रमास लातूर रेणापूर तालुक्‍यासह औसा तालुक्‍यातील भादा सर्कल मधील भाजपाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ऊस उत्‍पादक शेतकरी मोठया संखेने उपस्थित होते.

About The Author