गांजाविक्री करणाऱ्या तरुणाला अटक

गांजाविक्री करणाऱ्या तरुणाला अटक

पिंपरी (रफिक शेख ) : गांजा विक्रीप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून दोन किलो गांजा जप्त केला आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाने लीलाबाई प्राथमिक शाळेजवळ मोहननगर, चिंचवड येथे बुधवारी (दि. २३) पावणेतीनच्या सुमारास ही कारवाई केली.

अलंकार भाऊराव भोसले (वय २२, रा. मोहननगर, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह शुभम बनसोडे (वय २८, रा. आंबेडकरनगर, तुळजापूर रोड, उस्मानाबाद) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अलंकार याने त्याच्या घरी विक्रीसाठी गांजा आणला असल्याची माहिती पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी आरोपी अलंकार याच्या घरी छापा मारून कारवाई केली. त्यात पोलिसांना ५० हजार ९२५ रुपयांचा दोन किलो ३७ ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. त्याने हा गांजा आरोपी शुभम बनसोडे याच्याकडून आणला असल्याचे पोलीस तपासात समोर आले. पोलिसांनी अलंकार याला अटक करत शुभम बनसोडे याच्या विरोधात देखील गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी तपास करीत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये गांजा विक्रीसाठी नेमका कोठून येतो याचा मास्टरमाईंड कोण, याचा तपास करुन त्यावर कारवाई करण्याची गरज आहे.

About The Author