केलेल्या कष्टाचा मोबदला मिळत नसेल तर तरुणांनी संघर्षासाठी पुढे यावे – आ. कराड
लातूर (प्रतिनिधी) : मांजरा परिवारातील साखर कारखान्यांनी शासनाच्या नियमानूसार एफआरपी प्रमाणे गाळप केलेल्या ऊसाला भाव द्यावा यासाठी मांजरा कारखान्यासमोर आंदोलन केले मात्र अद्याप शेतकर्यांना भाव मिळालेला नाही. बापाने केलेल्या कष्टाचा, घामाचा, हक्काचा मोबदला मिळत नसेल तर तरुणांनी रस्त्यावर उतरुन संघर्ष करणे गरजेचे आहे. असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केले.
लातूर तालुक्यातील मौजे भातखेडा आणि भाडगाव येथील जवळपास ७० लक्ष रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या शुभहस्ते रविवार दि.२७ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात झाला यावेळी ते बोलत होते. दोन्ही गावात वाजत-गाजत आ. कराड यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमास भाजपाचे जिल्हा सरचिटणीस विक्रमकाका शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष गोविंद नरहरे, भागवत सोट, चंद्रसेननाना लोंढे, पांडुरंग बालवाड, राम बंडापल्ले, आदिनाथ मुळे, प्रताप पाटील, लक्ष्मण नागीमे, व्यंकटराव जटाळ, मारुती शिंदे यांच्यासह आणि त्यांची प्रमुख उपस्थिती होती.
मांजरा कारखान्याची १५-१६ रिकव्हरी येत होती. तोच कारखाना, तीच जमीन, तोच ऊस, तिथलंच पाणी आणि ऊस पिकवणारा शेतकरीही तोच असताना असा काय बदल झाला ? आणि ८-९ रिकव्हरी येवू लागली असा प्रश्न उपस्थित करुन आ. कराड म्हणाले की, एफआरपी काय असते हे आजपर्यंत सहकार महर्षींनी शेतकर्यांना कळूच दिले नाही. एफआरपी प्रमाणे ऊसाला भाव देणे शासनाने बंधनकारक केल्यापासून रिकव्हरी आपोआप खाली आली. गेल्या गळीत हंगामात मांजराचा २७७५/ रुपये एफआरपी प्रमाणे भाव निघाला मात्र केवळ २३००/ रुपये शेतकर्यांच्या पदरात पडले. केलेल्या कष्टाचा मोबदला मिळत नसेल तर रस्त्यावर उतरुन संघर्ष करावा लागेल. चालू गळीत हंगामात प्रत्येक गावा-गावात मोठ्या प्रमाणात ऊस उभा असून गेटकिनचा ऊस आणून गाळपात विक्रम केला आहे. शेतकर्यांची होणारी अडवणूक आणि पिळवणूक थांबवून त्यांना न्याय देण्यासाठी प्रतिदिन दोन हजार मॅ.टन ऊसाचे गाळप करणार्या प्रकल्पाची उभारणी लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यातील महाविकास आघाडी सरकार नसून महावसूलीच्या या सरकार मधिल मंत्र्याने देशविघातक कृत्य करणार्या दहशतवाद्याच्या संबंधिताशी आर्थिक व्यवहार केल्याचे सिद्ध झाल्याने त्यांना जेल मध्ये जावे लागले. देशद्रोहींना मदत करणार्या अशा मंत्र्याला समर्थन देण्यासाठी काँग्रेसने उपोषण केले. हे दुर्दैवी असून अतिवृष्टी, पूरपरिस्थिती अशा विविध संकटात सापडणार्या शेतकर्यांना मदत व्हावी म्हणून कधीच आंदोलन करावे वाटले नाही. असे सांगून आ. कराड म्हणाले की, राज्यातील हे आलिबाबा आणि चाळीसचोरांचे महावसुली सरकार फार काळ सत्तेवर राहणार नाही. आज जी काही विकासाची कामे होत आहेत ती सर्व कामे केंद्रशासनाच्या विविध विभागामार्फत होत असल्याचे बोलून दाखविले.
भातखेडा येथील कार्यक्रमात भातखेडा ते भाडगाव रस्त्याचे डांबरीकरण, विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर सभागृह, दलित वस्तीत पाणीपुरवठा, जिल्हा परिषद शाळेत भोजन कक्ष आणि भातखेडा ते चिकलठाणा शेत रस्ता या ५३ लक्ष रुपयांच्या कामाचा शुभारंभ तसेच ७ लक्ष रुपये खर्चाच्या भाडगाव येथे खंडोबा मंदिर सभागृह बांधकामाचे भूमिपूजन आ. कराड यांच्या हस्ते झाले. भातखेडा येथे कार्यक्रमास सरपंच शांताबाई मुळे, रुपेश काळे, राजाभाऊ आचवले, त्र्यंबक मुळे, शिवराज बेंद्रे, यशवंत मुळे, सुशांत मुळे तर भाडगाव येथील कार्यक्रमास ह.भ.प. गोपीनाथ डोपे गुरुजी, वसंत जोशी, रयत प्रतिष्ठानचे रामदास काळे, पांडुरंग शिंदे, किरण पुरी, शिवाजी मोरे, सचिन साबदे, अभिमन्यू डोपे, दत्ता माने, सचिन पासमे, व्यंकट सुरवसे, कमलाकर बाचपल्ले, राजकुमार चिंचोळे, शिवाजी मोरे, राहुल मोरे यांच्यासह अनेकजण होते. या दोन्ही ठिकाणी झालेल्या जाहीर कार्यक्रमास महिला पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या त्या गावात ग्रामस्थांनी वाजत गाजत सर्व मान्यवरांचे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले.