Police Flash News

आईच्या हातच्या पापडांना धीरजकुमार यांनी दिली आधुनिक उद्योगाची झळाळी! अवघ्या ५० हजारांच्या भांडवलातून उभारला ‘मातोश्री’ ब्रँड; रयत प्रतिष्ठानच्या ‘उद्योगरत्न पुरस्काराने धीरजकुमार भनगीरे सन्मानित

0
4
आईच्या हातच्या पापडांना धीरजकुमार यांनी दिली आधुनिक उद्योगाची झळाळी!

अवघ्या ५० हजारांच्या भांडवलातून उभारला ‘मातोश्री’ ब्रँड; रयत प्रतिष्ठानच्या ‘उद्योगरत्न पुरस्काराने धीरजकुमार भनगीरे सन्मानित

लातूर (एल पी उगीले) आईच्या हातच्या पापडांची पारंपरिक चव, तिच्या कष्टांचा वारसा आणि स्वतःच्या मेहनतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याची जिद्द... या बळावर लातूरच्या धीरजकुमार भनगीरे यांनी पापड उद्योगात यशाची नवी भरारी घेतली आहे. अवघ्या ५० हजार रुपयांच्या भांडवलातून सुरू केलेल्या ‘मातोश्री फूड्स अँड स्पायसेस’ या उद्योगाने आज राज्यभरात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या प्रेरणादायी उद्योजकीय प्रवासाची दखल घेत रयत प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना प्रतिष्ठेचा ‘उद्योगरत्न पुरस्कार-२०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.

येथील भालचंद्र ब्लड बँकेच्या सभागृहात रयत प्रतिष्ठानचा ११ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आयोजित ‘रयतरत्न पुरस्कार सोहळा-२०२६’मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये उद्योग क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल धीरजकुमार भनगीरे यांना ‘उद्योगरत्न पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले.

मूळचे लातूरचे असलेले धीरजकुमार यांनी एमबीए (मार्केटिंग)चे शिक्षण घेण्यासाठी मुंबई गाठली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी ओम लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट कंपनीत नोकरी सुरू केली. या नोकरीच्या काळात गुजरात आणि राजस्थानमधून देशभरासह परदेशात होणारी पापडांची विक्री, त्यामागील बाजारपेठ आणि या उद्योगाची व्याप्ती यांचा त्यांनी जवळून अभ्यास केला. यातूनच आपल्या लातूरमध्येही असा उद्योग उभारून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देता येईल, ही कल्पना त्यांच्या मनात रुजली.

आईने सुरू केलेल्या पारंपरिक पापड व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन त्याचा मोठ्या उद्योगात विस्तार करण्याचा त्यांनी निर्धार केला. यासाठी सुरू असलेल्या नोकरीचा राजीनामा देण्याचे धाडस त्यांनी दाखविले. उद्योगपती रतन टाटा यांच्या कार्यातून प्रेरणा घेत २०१८ मध्ये अवघ्या ५० हजार रुपयांच्या भांडवलावर एका छोट्या मशीनच्या साहाय्याने त्यांनी पापड उद्योगाची मुहूर्तमेढ रोवली.

उद्योगाची सुरुवात करताना त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. पापड निर्मिती हा महिलांचाच व्यवसाय, अशी समाजातील पारंपरिक मानसिकताही त्यांच्या मार्गात अडथळा ठरली. मात्र, लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर विश्वास ठेवत त्यांनी मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर वाटचाल सुरू ठेवली. छोट्या मशीनपासून सुरू झालेल्या या व्यवसायाचे रूपांतर पुढे अत्याधुनिक आणि स्वयंचलित यंत्रसामग्रीच्या साहाय्याने विकसित झालेल्या उद्योगात झाले. आज ‘मातोश्री फूड्स अँड स्पायसेस’ हे लातूर जिल्ह्यातील पापड उत्पादन क्षेत्रातील महत्त्वाचे नाव बनले आहे. या उद्योगाच्या माध्यमातून स्थानिक महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत.

‘मातोश्री फूड्स अँड स्पायसेस’मध्ये उडीद, मूग, तांदूळ, पोहा, ज्वारी, बाजरी, नाचणी, बटाटा, भगर, साबुदाणा, हरभरा आणि गहू अशा १२ प्रकारच्या पापडांची निर्मिती केली जाते. याशिवाय शेवई, कुरडई, खारोडी, लोणचे, सेंद्रिय हळद आणि मिरची पावडर यांसारख्या उत्पादनांचीही निर्मिती केली जाते. पारंपरिक चव आणि आधुनिक उत्पादन पद्धती यांचा सुरेख संगम साधत ‘मातोश्री’ने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे.

लातूरच्या मातीतून तयार झालेला हा ब्रँड आता जागतिक बाजारपेठेत पोहोचविण्याचे स्वप्न धीरजकुमार यांनी उराशी बाळगले आहे. भविष्यात पूर्णपणे स्वयंचलित यंत्रसामग्रीच्या माध्यमातून उत्पादन क्षमता वाढविणे, ‘मातोश्री’ची उत्पादने परदेशात निर्यात करणे, गुणवत्तेचा दर्जा कायम राखणे, स्थानिक उद्योजकांना मार्गदर्शन व सहकार्य करणे आणि लातूरमधील अधिकाधिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देणे, असा त्यांचा संकल्प आहे.

आईच्या हातच्या पापडांतून सुरू झालेला हा प्रवास आज आधुनिक उद्योगाच्या रूपाने विस्तारत आहे. आईच्या कष्टांना व्यावसायिक यशाची जोड देत तिच्या संस्कारांचा वारसा पुढे नेण्याचे काम धीरजकुमार यांनी केले आहे. प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता घेतलेली झेप, उद्योग उभारणीतील जिद्द आणि स्थानिकांना रोजगार देण्याची सामाजिक बांधिलकी यामुळे त्यांचा हा प्रवास नवउद्योजकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. एका छोट्या मशीनपासून सुरू झालेल्या ‘मातोश्री’च्या प्रवासाला आता पुरस्काराच्या रूपाने कौतुकाची पावती मिळाली असून, लातूरच्या उद्योजकीय क्षेत्रासाठी ही अभिमानास्पद बाब ठरली आहे. मातोश्री पापड उद्योगाला जानेवारी 2026 मध्ये "महाराष्ट्र बिजनेस आयकॉन अवॉर्ड" ज्येष्ठ बॉलीवूड अभिनेत्री वर्षा उसगावकर यांच्या हस्ते प्राप्त झालेला आहे.

रयत प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुरस्कार वितरण सोहळ्यात धीरज कुमार यांना रयतरत्न उद्योग रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. अशोक ढवण, राजर्षी शाहू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे, सिनेअभिनेता व निवेदक बालाजी सुळ यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच रयत प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष रामदास काळे, सचिन फत्तेपुरे, नेताजी रणखांब, सूर्यकांत लोखंडे, सुनीलकुमार डोपे, वैशालीताई लोंढे, श्वेताताई लोंढे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts