उदगीर (एल पी उगीले) भारतीय शेतकरी अनेक कायद्यांच्या शृंखलेत अडकलेला आहे. कृषी सुधारणा कायद्यांचा उद्देश शेतकऱ्यांना आपल्या शेतमालाच्या विक्रीबाबत अधिक स्वातंत्र्य मिळवून देणे हा होता. अज्ञानातून कृषी सुधारणा कायद्याला विरोध करणे हे शेतकऱ्यांच्या अहिताचे होते, असे प्रतिपादन एमएसपी समितीचे सदस्य तथा ऑल इंडिया किसान कोऑर्डिनेशन कमिटीचे सरचिटणीस गुणवंत पाटील हंगरगेकर यांनी केले.
दि. लिं. होळीकर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित दि. लिं. होळीकर स्मृती व्याख्यानमालेचे १३ वे पुष्प ‘कृषी सुधारणा कायदे आणि बाजार समितीचे भविष्य’ या विषयावर गुंफण्यात आले. या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रा. मनोहर पटवारी होते.
यावेळी दि. लिं. होळीकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष राम जाधव, अध्यक्ष प्रकाश साखरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य कल्याण पाटील तसेच दि. लिं. होळीकर आदर्श शिक्षक पुरस्काराच्या मानकरी सौ. अनिता घोणे उपस्थित होत्या.
हंगरगेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण विवेचनातून कृषी क्षेत्राशी संबंधित विविध कायदे, धोरणे आणि बाजारव्यवस्थेचा ऊहापोह केला. एमएसपी म्हणजे काय, कृषी सुधारणा कायद्यांचे स्वरूप काय होते, सीलिंग अॅक्टचा शेतीवर काय परिणाम झाला आणि भारतीय संविधानाच्या नवव्या अनुसूचीचे महत्त्व काय, याची उदाहरणांसह त्यांनी मांडणी केली. भारतातील शेतीव्यवस्थेची तुलना जगातील विविध देशांतील शेती व शेतकरी धोरणांशी करत त्यांनी सुमारे तासभर श्रोत्यांना खिळवून ठेवले.
“शेतकऱ्यांच्या शेतमालाला ज्या ठिकाणी चांगला भाव मिळतो, त्या ठिकाणी तो माल विकण्याचा अधिकार शेतकऱ्याला असला पाहिजे,” असे सांगत हंगरगेकर यांनी बाजारव्यवस्थेतील शेतकऱ्याच्या भूमिकेवर भाष्य केले. शेतीच्या उत्पादनखर्च, जमीनधारणा मर्यादा आणि बाजारपेठेतील स्वातंत्र्य यांसंबंधी विविध प्रश्न त्यांनी उपस्थित केले. “शेतकऱ्यांवर जमीनधारणेच्या मर्यादा असतील तर अशा मर्यादांचा व्यापक आर्थिक परिणाम काय होतो?”, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
यावेळी श्रोत्यांनी विविध प्रश्न विचारले. प्रश्नोत्तराच्या सत्रात हंगरगेकर यांनी एमएसपी, बाजार समित्या, जमीनधारणा, शेतमालाची विक्री आणि कृषी धोरणांबाबत अभ्यासपूर्ण उत्तरे देत श्रोत्यांच्या शंकांचे निरसन केले.
अध्यक्षीय समारोपात प्रा. मनोहर पटवारी यांनी ‘आजचा तरुण आणि शेती’ या विषयावर चिंता व्यक्त केली. शेतीकडे तरुणांचा पाहण्याचा दृष्टिकोन, शेतीसमोरील आव्हाने आणि शासनाच्या धोरणांसोबतच समाजाने व व्यक्तींनीही काय करायला हवे, याचे आत्मचिंतन करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
यावेळी जि. प. प्रशाला, डिगोळ येथील सहशिक्षिका सौ. अनिता घोणे यांना दि. लिं. होळीकर आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते त्यांना स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, शाल व पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले. स्वागत गीत उषाताई तोंडचिरकर यांनी तर प्रास्ताविक प्रतिष्ठानचे सचिव प्रा. डॉ. दत्ताहरी होनराव यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. माधव कांबळे यांनी तर आभार माधव सावरगावे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वीरभद्र स्वामी, तुकाराम बिरादार , प्रा .मनोहर भालके, मुरलीधर जाधव यासह अनेक मान्यवरांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक, शेतकरी तसेच विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Responses (0 )