Police Flash News

स्वामी रामानंद तीर्थांनी घडविली देशभक्तांची पिढी – प्रा. श्रीहरी वेदपाठक:हैदराबाद मुक्तीचा लढा हा लोकशक्तीचा लढा’

0
79
स्वामी रामानंद तीर्थांनी घडविली देशभक्तांची पिढी – प्रा. श्रीहरी वेदपाठक:हैदराबाद मुक्तीचा लढा हा लोकशक्तीचा लढा’

उदगीर (प्रतिनिधी)

स्वामी रामानंद तीर्थ यांनी शिक्षक म्हणून कार्य केलेल्या हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेपासून अंबाजोगाई येथील योगेश्वरी नूतन विद्यालयापर्यंत त्यांच्या कार्यातून देशभक्तांची मोठी फळी घडली. या शाळा म्हणजे देशभक्त घडविणारे कारखानेच होते, असे प्रतिपादन लातूर येथील प्रसिद्ध व्याख्याते व साहित्यिक प्रा. श्रीहरी वेदपाठक यांनी केले.

जिव्हाळा ग्रुपच्या वतीने गुरुकृपा हॉटेल, देगलूर रोड, उदगीर येथे स्वामी रामानंद तीर्थ जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. ‘मराठवाडा मुक्ती संग्रामाची लढाई गावागावातून लढली गेली. स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली झालेला हैदराबाद मुक्तीचा लढा हा लोकशक्तीचा लढा होता,’ असेही प्रा. वेदपाठक यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिव्हाळा ग्रुपचे सचिव लक्ष्मीकांत बिडवई होते. व्यासपीठावर मोहनराव खिंडिवाले व प्रा. डॉ. नाथराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. विठ्ठलराव फुलसे यांनी स्वागतगीत सादर केले. राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक विश्वनाथ मुडपे यांनी कवी फ. मु. शिंदे लिखित ‘शतकाची शृंखला तुटली...’ हे मराठवाडा मुक्ती संग्रामावरील गीत सादर करून उपस्थितांमध्ये देशभक्तीची भावना जागवली.

यावेळी डॉ. देवयानी नाथराव मोरे यांनी स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालय, अंबाजोगाई येथून एमबीबीएस शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षणासाठी पात्र ठरल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

अध्यक्षीय समारोपात लक्ष्मीकांत बिडवई यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या त्याग, समर्पण आणि नेतृत्वामुळे मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर कुलकर्णी यांनी केले, तर आभार कार्यक्रमाचे संयोजक डॉ. अनिल भिकाणे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी देविदासराव नादरगे व बाबुराव वाघमारे यांनी पुढाकार घेतला.

कार्यक्रमास रमाकांत बनशेळकीकर, वैजनाथराव पंचगल्ले, सोपानराव माने, अमृतराव देशपांडे, सच्चिदानंद पुठ्ठेवाड, नवनाथ पाटील, अशोकराव बिरादार, षण्मुखानंद मठपती, चंद्रकांत रोडगे, हावगीराव आचारे, सचिन बापूरे, संजय कानगुले आदींसह जिव्हाळा ग्रुपचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts