उदगीर (एल पी उगिले) येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात महाराष्ट्र विवेक वाहिनीचा कार्यक्रम घेण्यात आला.येथील विविध विभाग आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या महाराष्ट्र विवेक वाहिनीच्या संयुक्त विद्यमाने विवेकवादी व वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविणारा कार्यक्रम प्राचार्य डॉ. सुधीर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उप प्राचार्य शेषनाथ जाधव होते, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. सविता शेटे उपस्थित होत्या. यावेळी माधव बावगे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. अमर तांदळे यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला.
मार्गदर्शन करताना डॉ. सविता शेटे म्हणाल्या की, “महाराष्ट्र विवेक वाहिनी ही विवेकी विचारांच्या आधारे स्वतःचा आणि समाजाचा विकास कृतिशील व विधायक मार्गाने करू इच्छिणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांचे संघटन आहे.” शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेला हा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये प्रभावीपणे राबविला जात आहे. उच्च शिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांचीही या उपक्रमाला मान्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
वैज्ञानिक दृष्टिकोनाची निर्मिती ही प्रत्येक भारतीय नागरिकाची जबाबदारी असून बाल व युवा अवस्थेपासूनच वैज्ञानिक दृष्टिकोनाची रुजवण होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. विवेक वाहिनीच्या माध्यमातून वैज्ञानिक दृष्टिकोन, व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, लिंगसमभाव, जोडीदाराची विवेकी निवड, जीवनकौशल्ये, पर्यावरणपूरक सण-उत्सव आणि व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे विविध उपक्रम महाविद्यालयात राबविता येतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“आमचा विकास आमच्या हाती, हक्क हवेतच पण कर्तव्य आधी” या विवेक वाहिनीच्या ब्रीदवाक्याचा संदर्भ देत जबाबदार आणि विवेकी नागरिक घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.यानंतर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य अध्यक्ष माधव बावगे यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माहिती दिली व संघटनेची भूमिका स्पष्ट केली.
अध्यक्षीय समारोप करताना उप प्राचार्य शेषनारायण जाधव यांनी विद्यार्थ्यांनी अंधश्रद्धेपासून दूर राहून वैज्ञानिक दृष्टिकोन स्वीकारावा आणि समाजात विवेकवादी विचारांचा प्रसार करावा, असे सांगितले. विचार पीठवार जिल्हा प्रधान सचिव प्रा. बळीराम बुक्तरे, स्थानिक शाखेचे कार्याध्यक्ष प्राचार्य विजयकुमार पाटील, उपाध्यक्ष बाबुराव माशाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. ज्योती तारे, प्रा.नयन भालेराव ,बी.प्रिन्सी यांनी परिश्रम घेतले. संचलन व आभार प्रदर्शन प्रा. अमर तांदळे यांनी केले.कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.














Responses (0 )