Police Flash News

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाला सुरुवात*

0
32
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ उपक्रमाला सुरुवात*

लातूर (एल पी उगीले) पोलीस विभागाकडून दोन दिवसांत २० गावांना भेटी; शेतकरी व नागरिकांशी साधला संवाद

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणाऱ्या सामाजिक व इतर विविध समस्यांना सामोरे जाण्यासाठी लातूर पोलीस विभागाच्या वतीने पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०१ ऑक्टोबर २०२६ ते ३० नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा विशेष कम्युनिटी पोलिसिंग उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून पोलीस अधिकारी व कर्मचारी थेट गावांमध्ये जाऊन शेतकरी, नागरिक, महिला, युवक तसेच ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. दुष्काळामुळे निर्माण होऊ शकणाऱ्या विविध सामाजिक समस्या, त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच भविष्यातील संभाव्य अडचणींबाबत नागरिकांशी चर्चा करून आवश्यक मार्गदर्शन करण्यात येत आहे.

उपक्रमाच्या सुरुवातीच्या दोन दिवसांत लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण २० गावांना भेटी देण्यात आल्या आहेत. यावेळी संबंधित गावातील शेतकरी व नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या.

किनगाव पोलीस ठाणे हद्दीतील कोळवाडी, मोळवण, हिंगणगाव, गोडाळा, सारोळा व खलंगरी या गावांना भेटी देण्यात आल्या. अहमदपूर पोलीस ठाणे हद्दीतील शिरूर ताजबंद व थोरलेवाडी, देवणी पोलीस ठाणे हद्दीतील विळेगाव, कासारशिरशी पोलीस ठाणे हद्दीतील कोराळी, रायलिंग व मुदगड, वाढवणा पोलीस ठाणे हद्दीतील वाढवणा बुद्रुक, चाकूर पोलीस ठाणे हद्दीतील चापोली व हुडगेवाडी, शिरूर अनंतपाळ पोलीस ठाणे हद्दीतील शिरूर अनंतपाळ व येरोळ, निलंगा पोलीस ठाणे हद्दीतील जाऊ व सावंगीरा, बाधा पोलीस ठाणे हद्दीतील काळमाथा तसेच मुरुड पोलीस ठाणे हद्दीतील भुसा या गावांना भेट देण्यात आली.

या भेटीदरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकरी व ग्रामस्थांशी संवाद साधून दुष्काळामुळे उद्भवणाऱ्या संभाव्य समस्या, आर्थिक अडचणी, स्थलांतर, सावकारी व जास्त व्याजाने कर्ज घेण्याचे धोके, गावातील सामाजिक सलोखा तसेच महिला व बालकांच्या सुरक्षिततेसंदर्भात आवश्यक काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन केले. तसेच कोणतीही समस्या निर्माण झाल्यास वेळेत पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

‘पोलीस आपल्या गावामध्ये’ हा उपक्रम ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत लातूर जिल्ह्यातील प्रत्येक गावात संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच दुय्यम अधिकारी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन त्या अनुषंगाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शेतकरी व नागरिकांनी पोलिसांसोबत सकारात्मक संवाद साधण्याचे आवाहन

यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या नैसर्गिक व सामाजिक समस्यांना सामोरे जाण्यासाठी हा उपक्रम शेतकरी व नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून राबविण्यात येत आहे. संभाव्य समस्या निर्माण होण्यापूर्वीच त्याबाबत आवश्यक पूर्वकाळजी घेणे, गावपातळीवर उपलब्ध असलेल्या यंत्रणांमध्ये समन्वय वाढविणे आणि सामूहिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

लातूर पोलीस विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व शेतकरी व नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गावातील समस्या, संभाव्य धोके व त्यावरील उपाययोजनांबाबत पोलिसांसोबत मोकळेपणाने चर्चा करून पोलीस व ग्रामस्थ यांच्या समन्वयातून दुष्काळाच्या परिस्थितीला सामूहिकपणे सामोरे जावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts