‘
उदगीर (एल पी उगीले) तंत्रज्ञानाच्या युगात ज्येष्ठ नागरिकांनी काळानुसार बदल स्वीकारताना सायबर गुन्हेगारी पासूनही सावध राहणे गरजेचे आहे. मोबाईल, ओटीपी, बँक खात्याची माहिती किंवा कोणतेही गोपनीय तपशील अनोळखी व्यक्तीला देऊ नका. फोनवरून संशयास्पद माहिती मागितली गेल्यास तत्काळ सावध व्हा, आणि फसवणुकीची शंका आल्यास बँक व पोलिसांशी त्वरित संपर्क साधा, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघ व पोलीस दलाच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक प्रफुल्ल वाघमारे उपस्थित होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक संघाचे प्रमुख मार्गदर्शक रमेशअण्णा अंबरखाने, डॉ. अनिल भिकाने व अध्यक्ष प्रा. रमाकांत मध्वरे उपस्थित होते.
‘ओटीपी सांगितला म्हणजे खात्याची चावी दिली!’
सायबर सुरक्षा व घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन करताना भातलवंडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करताना विशेष दक्षता बाळगण्याचे आवाहन केले. ‘तुमच्या खात्यात संशयास्पद व्यवहार झाला आहे’, ‘तुमचे बँक खाते बंद होणार आहे’, ‘केवायसी अपडेट करा’, ‘तुम्हाला बक्षीस लागले आहे’ अशा विविध कारणांनी येणाऱ्या फोनवर विश्वास ठेवू नका. कोणत्याही परिस्थितीत ओटीपी, एटीएम किंवा डेबिट कार्डची माहिती, पासवर्ड अथवा बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तीला देऊ नये, असे त्यांनी स्पष्ट केले.
मोबाईलवर आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करणे, अपरिचित व्यक्तीच्या सांगण्यावरून ॲप डाउनलोड करणे किंवा स्क्रीन शेअर करणे टाळावे. व्यवहार करताना घाई न करता खात्री करूनच पुढील प्रक्रिया करावी. काही गडबड अथवा संशय वाटल्यास स्वतःहून निर्णय घेण्याऐवजी तातडीने बँक किंवा पोलिसांशी संपर्क साधावा, असा सल्लाही त्यांनी दिला.
‘तंत्रज्ञानापासून दूर राहणे हा उपाय नाही; तर तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर शिकणे आवश्यक आहे. स्मार्ट फोन वापरताना आपणही स्मार्ट राहिले पाहिजे,’ असे सांगत भातलवंडे यांनी ज्येष्ठ नागरिकांना सायबर सुरक्षेबाबत जागरूक केले.
मुख्य प्रबंधक प्रफुल्ल वाघमारे यांनीही ऑनलाइन बँकिंग, डिजिटल व्यवहार आणि बँकिंग सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. सायबर फसवणुकीच्या वाढत्या प्रकारांच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांनी जागरूक राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
‘होऊन जाऊ या लहान पुन्हा एकदा...’
मार्गदर्शनानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन भातलवंडे यांनी ‘होऊन जाऊ या लहान पुन्हा एकदा’ ही कविता सादर केली. त्यांच्या उत्स्फूर्त सादरीकरणाला उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कवितेतून त्यांनी ज्येष्ठ नागरिकांमध्ये नवचैतन्य आणि सकारात्मकतेची भावना निर्माण केली.
प्रास्ताविक प्रा. रमाकांत मध्वरे यांनी केले. सूत्रसंचालन सचिव मुरलीधर जाधव व ज्योती डोळे यांनी केले. चंद्रकला बिरादार यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला.














Responses (0 )