उदगीर (एल पी उगीले) येथील मातृभूमी प्रतिष्ठान शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातृभूमी महाविद्यालय, कस्तुराबाई नर्सिंग स्कूल, मातृभूमी नर्सिंग स्कूल आणि इनर व्हील क्लब, उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक हृदय दिनानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सविता पदातुरे होत्या, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. दत्तात्रय पवार उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. प्रियांका राठोड यांनी केली.
यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. दत्तात्रय पवार यांनी हृदयविकार व हृदयविकाराचा झटका येण्याची कारणे, प्रमुख लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती दिली. हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप, ताणतणावाचे योग्य व्यवस्थापन, व्यसनांपासून दूर राहणे तसेच वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. हृदयविकाराची लक्षणे वेळीच ओळखून तातडीने वैद्यकीय मदत घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ. सविता पदातुरे यांनी दैनंदिन जीवनशैलीमध्ये छोटे-छोटे सकारात्मक बदल करून हृदयाचे आरोग्य दीर्घकाळ निरोगी ठेवता येते, असे सांगितले. योग्य आहार, नियमित शारीरिक हालचाल, निरोगी जीवनशैली आणि मानसिक ताणावर नियंत्रण यांचे हृदयाच्या आरोग्यासाठी असलेले महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण मद्देवाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन रेखा नक्षत्रे यांनी केले.
यावेळी प्रा. रणजीत मोरे, प्रा. उस्ताद सय्यद, प्रा. अन्वेश हिप्पळगावकर, राहुल जाधव, नेहा वाघमारे, ऋतुजा दहिकांबळे यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जागतिक हृदय दिनानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये तसेच उपस्थितांमध्ये हृदयविकाराबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच निरोगी जीवनशैलीचा संदेश देण्यात आला.














Responses (0 )