‘
लातूर (एल पी उगीले) पावसा अभावी शेतीपिकांवर संकटाचे सावट गडद होत असताना दुष्काळाच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी पोलीस प्रशासन थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. दुष्काळाच्या कठीण काळात शेतकऱ्यांच्या पाठीशी पोलीस दल खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास देत उपविभागीय पोलीस अधिकारी, चाकूर उपविभागाचे श्री. मायने यांनी शिरूर अनंतपाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधला.
दुष्काळाची परिस्थिती ही केवळ पिकांपुरती मर्यादित राहत नाही, तर त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनावर आणि आर्थिक नियोजनावरही होतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या समस्या, अडचणी आणि त्यांच्या मनातील चिंता जाणून घेण्यासाठी पोलीस अधिकारी थेट गावपातळीवर पोहोचले. शेतकऱ्यांनी कोणत्याही अडचणीच्या प्रसंगी घाबरून न जाता पोलिसांशी संपर्क साधावा, पोलीस प्रशासन त्यांच्या सोबत आहे, असा धीर यावेळी देण्यात आला.
शेतकऱ्यांशी संवाद साधताना गावातील सुरक्षितता, कायदा व सुव्यवस्था तसेच दुष्काळाच्या काळात उद्भवू शकणाऱ्या विविध समस्या याबाबतही चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि अडचणीच्या काळात त्यांना प्रशासनाचा आधार मिळावा, यासाठी पोलीस यंत्रणा नागरिकांच्या संपर्कात राहणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
‘पोलीस आपल्या सोबत आहेत’ हा संदेश केवळ शब्दांत न राहता तो प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. संकटाच्या काळात नागरिकांशी संवाद साधणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांना मानसिक आधार देणे, हीदेखील पोलिसांची सामाजिक जबाबदारी आहे.
ज्येष्ठ नागरिकांना सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन.
यावेळी ज्येष्ठ नागरिकांशीही संवाद साधून वाढत्या सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. मोबाईलवर येणारे अनोळखी फोन, संशयास्पद संदेश व लिंक, बनावट बँक अधिकारी, केवायसी अद्ययावत करण्याच्या नावाखाली होणारी फसवणूक तसेच ऑनलाइन आर्थिक व्यवहारांमध्ये घ्यावयाची खबरदारी याबाबत माहिती देण्यात आली.
ओटीपी, पासवर्ड, एटीएम किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती कोणालाही देऊ नये आणि संशयास्पद ऑनलाइन व्यवहार झाल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.














Responses (0 )