Police Flash News

उदगीर येथे अवैध सावकारी प्रकरणी छापा; सहकार व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई

0
2
उदगीर येथे अवैध सावकारी प्रकरणी छापा; सहकार व पोलिस विभागाची संयुक्त कारवाई

उदगीर (एल पी उगीले) उदगीर तालुक्यातील कथित विनापरवाना अवैध सावकारी व्यवहाराबाबत सहकार विभागाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीच्या चौकशी अनुषंगाने महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ च्या कलम १६ अंतर्गत कार्यवाही करण्यात आली आहे. उदगीर येथील मिनी उद्योग भवनजवळील रहिवासी सुधीर जगन्नाथ पारसेवार यांच्या विरोधात दाखल झालेल्या तक्रारीनुसार सहकार विभाग आणि पोलिस विभागाच्या संयुक्त पथकाने ५ ऑक्टोबर २०२६ रोजी त्यांच्या राहत्या घरी झडती व तपासणी मोहीम राबवली.

या झडती कारवाईदरम्यान पुढील चौकशीसाठी संशयित असलेले कोरे बॉन्ड, कोरे चेक, व्याजाचा उल्लेख असलेल्या हिशोब वह्या आणि खरेदी-विक्री दस्तऐवजांच्या प्रती ताब्यात घेण्यात आल्या असून सावकारी कायद्यांतर्गत पुढील कायदेशीर चौकशी केली जाणार आहे. लातूरचे जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड आणि पोलिस अधीक्षक अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विभागीय सहनिबंधक नानासाहेब चव्हाण व जिल्हा उपनिबंधक विष्णू पोतांगळे यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर आणि शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक यांनी आवश्यक प्रशासकीय मदत पुरवली, तर पथक प्रमुख म्हणून अश्विनी पुढेवाड यांनी कामकाज पाहिले. तसेच शासकीय दूध योजना विभागातील कर्मचाऱ्यांनी पंचाची भूमिका बजावली.

जर कोणी अवैध सावकारी करत असेल तर त्याबाबत लातूर येथील जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक किंवा प्रत्येक तालुक्यातील सहायक निबंधक कार्यालयाकडे गोपनीय स्वरूपात तक्रार नोंदवावी. तक्रारदाराचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवून दोषींवर तात्काळ कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन सहकार विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts