"
निलंगा (प्रतिनिधी) सध्याची दुष्काळी परिस्थिती, सिंचनासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे मर्यादित स्रोत आणि शेतीतील वाढता उत्पादन खर्च लक्षात घेता, यंदाच्या रब्बी हंगामात कमी पाण्यात येणाऱ्या पिकांची निवड व योग्य पीक नियोजन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आधुनिक जैन ठिबक सिंचन तंत्रज्ञान, जलव्यवस्थापन आणि शास्त्रीय पीक पद्धतींचा अवलंब केल्यास कमी पाण्यातही हरभरा, रब्बी ज्वारी तसेच खोडवा ऊस पिकांचे उत्पादन घेणे शक्य आहे, असे प्रतिपादन कृषी शास्त्रज्ञ डॉ. गुणवंत एस. डफरे यांनी केले.
जैन इरिगेशन,जळगाव आणि तिरुपती एजन्सी, निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन, कमी पाण्यातील पीक उत्पादन तंत्रज्ञान आणि आधुनिक सूक्ष्म सिंचन पद्धतींबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
डॉ. डफरे म्हणाले की, लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात अनेक ठिकाणी विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची पातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्यावर आधारित पीक नियोजन करणे आवश्यक आहे. सिंचनासाठी मर्यादित पाणी उपलब्ध असतानाही हरभरा व रब्बी ज्वारीसारख्या तुलनेने कमी पाण्यात येणाऱ्या पिकांना प्राधान्य देणे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते.
खरीप हंगामातील सोयाबीनची काढणी पूर्ण झाल्यानंतर शेतातील उपलब्ध ओलावा, जमिनीचा प्रकार आणि सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचा अंदाज घेऊन रब्बी पिकांची निवड करावी. हरभरा व ज्वारीची पेरणी जैन ठिबक सिंचन पद्धतीवर जोडओळ पद्धतीने टोकण यंत्राच्या साहाय्याने करता येते. यासाठी दोन ओळींतील अंतर 45-60 सेंमी आणि दोन झाडांतील अंतर 10-15 सेंमी ठेवण्याचे नियोजन करता येते. ठिबक नळी दोन्ही ओळींच्या मध्यभागी येईल अशी ठेवावी.
पेरणीपूर्वी जमिनीतील ओलावा, वाफसा स्थिती आणि आवश्यक मुख्य व दुय्यम अन्नद्रव्यांची उपलब्धता तपासून खत व्यवस्थापन करावे. पिकांच्या वाढीच्या अवस्था, जमिनीचा प्रकार आणि प्रत्यक्ष ओलावा यानुसार 1 ते 1.5 तासाचे सिंचन, फक्त 5-7 वेळा नियोजन केले तरी पुरेसेआहे.
हिवाळ्यातील अनुकूल तापमान आणि तुलनेने कोरडे वातावरण यामुळे काही रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी राहू शकतो. तणांचे योग्य व्यवस्थापन, ठिबक द्वारे विद्राव्य संतुलित खतांचा वापर आणि गरजेनुसारच कीडनाशकांची फवारणी केल्यास उत्पादन खर्च कमी करण्यास मदत होते.
मराठवाड्यातील सिल्लोड,भोकरदन इतर भागांसह इतर जिल्ह्यांतही ठिबक सिंचनावर हरभरा व रब्बी ज्वारीच्या लागवड मागील 10 वर्षी पासून होत आहे. योग्य उत्पादन तंत्रज्ञान आणि बाजारभाव यांची सांगड घातल्यास शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळविण्याची संधी या दोन्ही पिकां मधून उपलब्ध होणार आहेत.
दुष्काळी परिस्थितीत खोडवा उसाचे व्यवस्थापन करताना पाण्याची बचत आणि जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यावर भर द्यावा, असे डॉ. डफरे यांनी सांगितले. यासाठी ऊसाचे पाचट न जाळता तेच पाचट सरीमध्ये पसरवून त्याचे जैविक आच्छादन म्हणुन वापर केल्यास जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होण्यास, जमिनीचे तापमान नियंत्रित ठेवण्यास आणि तणांचा प्रादुर्भाव कमी करण्यास मदत होते.
खोडवा उसासाठी योग्य पद्धतीने दोन ठिबक नळ्या सरी च्या मध्यभागी अंथराव्यात. नळ्यांच्या परिसरात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी पाणी शोषून धरणाऱ्या 'झेबा'सारख्या जलधारणक्षम पॉलिमरचा वापर शिफारशीनुसार 5 किलोग्राम प्रति एकर करता येतो.
उसाच्या वाढीच्या अवस्थेनुसार फवारणी करून अणि ठिबक द्वारे विद्राव्य संतुलित खताचा वापर करावा. पाण्याची उपलब्धता कमी असल्याने ठरावीक दिवसांच्या अंतराने सरी मध्ये सिंचन करण्यापेक्षा जमिनीतील ओलावा, हवामान आणि पिकांची अवस्था यांचा विचार करून ठिबक द्वारे सिंचनाच्या पाळ्या निश्चित कराव्यात. पाना द्वारे होणारे बाष्प उत्सर्जन कमी करण्या साठी आवश्यकता वाटल्यास 7% केओलिन चि फवारणी करावी.या उपाययोजनां मुळे उपलब्ध पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करून खोडवा उसाची वाढ टिकवून ठेवण्यास मदत होऊ शकते.
जैन इरिगेशन, जळगाव अणि तिरुपती एजन्सी, निलंगा यांच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या शंकांचे निरसन मागीलआठवडय़ात पासून करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे कमी पाण्यात पीक उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती व योग्य नियोजनाची दिशा मिळत असल्याने शेतकर्याकडून चांगला प्रतिसाद ही मिळत आहे.कृषी विभागामार्फत ठिबक सिंचनावर महाडिबिटी ,पोकरा मार्फत मिळणार्या सबसीडी चा लाभ घ्यावा. असे आवाहन गुणवंतराव गायकवाड यांनी केले. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे कृषी विभाग मार्फत विनाअट 90% सबसिडी महाराष्ट्र सरकारने शेतकर्यांना थेट द्यावी. अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. उपक्रमा बद्दल अनेक शेतकर्यांनी समाधान व्यक्त केलेत.














Responses (0 )