Police Flash News

महिलांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणार : आ. संजय बनसोडे

0
6
महिलांसाठी रोजगारनिर्मितीच्या संधी उपलब्ध करून देणार : आ. संजय बनसोडे

उदगीर (प्रतिनिधी) महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांना कौशल्याधारित प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. महिलांनी आपल्या कौशल्याचा उपयोग करून आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, यासाठी रोजगारनिर्मितीच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.

उदगीर शहरातील सादिया शिवणकला प्रशिक्षण केंद्राच्या वतीने कौशल्यपूर्ण प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपनगराध्यक्षा शितल शिंदे, महिला व बालकल्याण सभापती सय्यद खुर्शिदबी, जि.प. गटनेते दिलीपकुमार मटके, बालाजी भोसले , श्याम डावळे, बाळासाहेब मरलापल्ले, विकी भोसले, इमरान सय्यद, संध्या गांजुरे, ओम गांजुरे, शिवकुमार कांबळे , गणेश गायकवाड, धीरज कसबे, शेख इरफान, बालाजी रणदिवे, सीमा नेत्रगावे, सुजाता कोंडाळे, आयोजक शेख सलमा, खुर्शिद आलम आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना आ.संजय बनसोडे म्हणाले की, आजच्या काळात महिलांनी केवळ शिक्षणापुरते मर्यादित न राहता विविध कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे आहे. शिवणकलेसारख्या व्यवसायाभिमुख प्रशिक्षणातून महिला स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकतात. त्यातून त्यांना आर्थिक उत्पन्न मिळण्या बरोबरच कुटुंबाला हातभार लावता येतो. महिलांच्या कौशल्याला योग्य संधी मिळाल्यास त्या निश्चितच यशस्वी उद्योजिका बनू शकतात.

सादिया शिवणकला प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून महिलांना शिवणकलेचे प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबनाच्या दिशेने वाटचाल करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. अशा प्रशिक्षण केंद्रांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होऊन रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्यास मदत होते.

प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांचे यावेळी प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले. महिलांनी प्रशिक्षणाचा उपयोग करून स्वतःच्या पायावर उभे राहावे आणि इतर महिलांनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, असे आवाहनही आ. बनसोडे यांनी केले.या गौरव सोहळ्यामुळे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts