लातूर (एल पी उगीले) शहरा मध्ये आपल्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील जिल्ह्यातील महिलांना लातुरात बोलावून वेश्या व्यवसायास प्रवृत्त करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे, या धाडीमध्ये; रोख रक्कम व इतर साहित्य जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.
लातूर शहरात आर्थिक फायद्यासाठी महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाच्या पथकाने माऊली नगर परिसरातील अंबिका निवास येथील एका फ्लॅटवर छापा टाकून वेश्या व्यवसायाचे प्रकरण उघडकीस आणले. या कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली आहे.
गुन्ह्यातील आरोपी जावेद सय्यद हा रुपाली माळी हिने भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये बाहेरील जिल्ह्यातील तसेच लातूर शहरातील महिलांना बोलावून घेत असे. त्यांना पैशांचे आमिष दाखवून ग्राहकांकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची खातरजमा करून वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक विठ्ठल शिवाजी दराडे यांना छापा कारवाईसाठी सोबत घेण्यात आले. त्यानंतर दोन पंच व एका बनावट ग्राहकाच्या मदतीने नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचण्यात आला.
दि. ३० ऑक्टोबर रोजी सायंकाळी सुमारे ४.५५ वाजता माऊली नगर येथील अंबिका निवासमधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २ येथे पोलिसांनी छापा टाकला. यावेळी फ्लॅटमध्ये जावेद युसूफ सय्यद (वय ३३, रा. करीम नगर, लातूर),जयश्री राम तरोडे (वय ४०, रा. प्रकाश नगर, लातूर) हे आढळून आले. तसेच नागपूर येथील २१ वर्षीय महिला एका स्वतंत्र खोलीत आढळून आली. पोलिसांनी पंचांसमक्ष केलेल्या तपासणीत बनावट ग्राहकाला देण्यात आलेली दोन हजार रुपयांची रक्कम जावेद सय्यद याच्याकडे मिळून आली. तसेच दोन कंडोम पाकिटेही जप्त करण्यात आली. पोलिसांनी पीडित महिलेची विचारपूस केली असता, वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या पैशांपैकी काही रक्कम जावेद सय्यद, जयश्री तरोडे व अन्य संबंधित व्यक्ती आपापसात वाटून घेत असल्याची माहिती समोर आली.या प्रकरणात विष्णू ऊर्फ वैष्णव हणुमंत पुरी (रा. कवळी, ता. औसा, जि. लातूर)याचाही सहभाग असल्याचे तपासात समोर आले. मात्र, पोलिसांचे पथक आल्याचे लक्षात येताच तो घटनास्थळावरून पळून गेला. तसेच फ्लॅट भाड्याने घेणारी रुपाली रावसाहेब माळी ही देखील घटनास्थळी आढळून आली नाही. या प्रकरणात तिच्यासह अन्य संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा तपास सुरू आहे.
सदर प्रकरणी पोलीस ठाणे शिवाजीनगर, लातूर येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२९/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४३(२), १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३, ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष पाटील करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस उपअधीक्षक डॉ.भगीरथी पवार यांच्या मार्गदर्शनात पोलीस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलीस निरीक्षक विठ्ठल दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक आजिनाथ पाटील, महिला पोलीस अंमलदार सुधामती वंगे, सदानंद योगी, लता गिरी, सचिन मुंडे यांनी केली आहे.














Responses (0 )