Police Flash News

2 नोव्हेंबर रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची जिल्हास्तरीय बैठक; ग्राहकांच्या समस्या व तक्रारी लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाह

0
42
2 नोव्हेंबर रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची जिल्हास्तरीय बैठक; ग्राहकांच्या समस्या व तक्रारी लेखी स्वरूपात सादर करण्याचे आवाह

लातूर (प्रतिनिधी)

ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे, बाजारपेठेतील गैरप्रकारांना आळा घालणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारींना योग्य न्याय मिळवून देण्यासाठी २ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा ग्राहक संरक्षण समितीची जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात येत आहे. या बैठकीच्या अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील सर्व ग्राहकांनी आपल्या समस्या, अडचणी व तक्रारी लेखी अर्जाद्वारे सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा ग्राहक संरक्षण समितीचे सदस्य दत्तात्रेय मिरकले पाटील व विवेकानंद वाडीकर यांनी केले आहे.

आजच्या बाजारपेठेत ग्राहकांची विविध प्रकारे आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. वस्तूंवर छापील असलेल्या कमाल किरकोळ किमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणे, खरेदीची पावती न देणे, मुदत संपलेल्या वस्तूंची विक्री करणे, खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणे, निकृष्ट दर्जाच्या वस्तू ग्राहकांच्या माथी मारणे, वजन-मापात तफावत ठेवणे तसेच फसव्या जाहिरातींद्वारे ग्राहकांची दिशाभूल करणे, असे प्रकार घडत आहेत. याशिवाय पॅकबंद वस्तूंवरील आवश्यक माहितीचा अभाव, ऑनलाइन खरेदीतील फसवणूक, हमी व वॉरंटी नाकारणे आणि विविध सेवा पुरविताना ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे आकारणे, अशा समस्यांबाबतही ग्राहकांना आपली तक्रार नोंदविता येणार आहे.

ग्राहकांनी तक्रार अर्ज सादर करताना संबंधित दुकानदार, व्यापारी, कंपनी किंवा सेवा पुरवठादाराचे नाव व पत्ता, घटनेची तारीख, तक्रारीचे स्वरूप आणि अपेक्षित कार्यवाही यांचा स्पष्ट उल्लेख करावा. तसेच खरेदीची पावती, बिल, वस्तूच्या पॅकिंगवरील MRP, उत्पादन व मुदत समाप्तीची तारीख दर्शविणारे छायाचित्र, ऑनलाइन व्यवहाराचे पुरावे, जाहिरातींचे स्क्रीनशॉट किंवा उपलब्ध इतर कागदपत्रे अर्जासोबत जोडावीत.

प्राप्त झालेल्या तक्रारी जिल्हास्तरीय बैठकीत संबंधित विभागांच्या निदर्शनास आणून देऊन त्यावर नियमानुसार योग्य कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार आहे. त्यामुळे ग्राहकांनी केवळ तोंडी तक्रारी न करता पुराव्यांसह लेखी अर्ज सादर करावेत. ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी प्रशासन आणि ग्राहक यांच्यात समन्वय निर्माण होणे आवश्यक आहे.

ग्राहकांची तक्रार ही केवळ एका व्यक्तीची समस्या नसून संपूर्ण बाजारव्यवस्थेतील गैरप्रकार उघड करण्याचे प्रभावी माध्यम आहे. आज आपण तक्रार केली तर उद्या दुसऱ्या ग्राहकाची फसवणूक टाळता येऊ शकते. त्यामुळे अन्याय सहन करू नका, ग्राहक म्हणून आपले हक्क ओळखा आणि तक्रार नोंदवा असे आवाहन करण्यात आले आहे.

S
WRITTEN BY

Superadmin

Responses (0 )

    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌
    ‌

Related posts