पंपावरील पेट्रोल, डिझेलची विक्री करीत ६६ लाखांची फसवणूक
पिंपरी (रफिक शेख) : पेट्रोलपंपावर व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेल्या दोघांनी पेट्रोल पंपाच्या टँकमधून टेस्टिंगसाठी काढलेल्या पेट्रोल व डिझेलची चोरी करून त्याची परस्पर विक्री केली. त्यानंतर बोगस ग्राहकांच्या नावे खाते बुक तयार करून त्याचा वापर करीत पेट्रोल पंपावरून रक्कम घेत ६६ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार हिंजवडी येथे घडला. याप्रकरणी मोहिनी महेश सोंडेकर (रा. सेक्टर क्रमांक सहा, संतनगर, प्राधिकरण, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण संपत पवार, संतोष बाबाजी आरण (रा. थेरगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांच्या मालकीच्या हिंजवडी येथील समर्थ सर्व्हिस स्टेशन येथील पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करणारे आरोपी यांनी फिर्यादीच्या परस्पर त्यांना कोणतीही माहिती न देता भूमिगत टॅन्कमधून पेट्रोल व डिझेल टेस्टिंगसाठी काढून घेतले. टेस्टिंग झाल्यानंतर ते पुन्हा टॅन्कमध्ये न टाकता त्याची चोरी करून ते परस्पर दुसरीकडे विकले. तसेच बोगस ग्राहकांच्या नावाने खाते बुक करून त्यावर त्यांचे खोटे शिक्के मारले. त्या रिसीट पंपावरील कर्मचारी गणेश बनसोडे, नवनाथ साठे यांना देऊन त्यांच्याकडून पंपावरील रोख रक्कम घेऊन फिर्यादीची ६६ लाख ७५ हजार ३९८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार एप्रिल २०१९ ते एप्रिल २०२१ या कालावधीत घडला. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.