चिखलीतील जुगार अड्यावर छापा
पुणे (प्रकाश इगवे) : जनावरांच्या बंदिस्त गोठ्यात सुरू असलेल्या तीन पत्ती जुगार अड्यावर पोलिसांच्या पिंपरी -चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा टाकला. यामध्ये ३८ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई चिखलीतील नेवाळे वस्ती येथे करण्यात आली. जुगार चालक-मालक स्वप्नील सुदाम मळेकर (वय ३०), जुगार खेळणारे किरण विष्णू नेवाळे (वय ४०), विजय नामदेव नेवाळे (वय ५०), सतीश बाजीराव नेवाळे (वय २८), अजय अनिल बिडकर (वय ३०), किशोर भानुदास कदम (वय २९), सागर अशोक पाटील (वय ३०, सर्व रा. नेवाळे वस्ती, चिखली) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. नेवाळे वस्ती येथे स्वप्नील मळेकर याच्या जनावरांच्या गोठ्यात काहीजण जुगार खेळत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली. त्यांच्याकडे चौकशी केली असता ते तीन पत्ती जुगार खेळत होते. मळेकर याच्या जनावरांच्या गोठ्यात हा उद्योग सुरु होता. दरम्यान, सात जणांकडून रोकड व जुगाराचे साहित्य असा ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.