लातूरकरांनी हिरकणी हाट महोत्सवास सहपरिवार भेट देण्याचे आवाहन
पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये हिरकणी हाट चे उद्घाटन
लातूर (प्रतिनिधी) : ग्राम विकास व जलसंधारण विभाग अंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा लातूरच्या वतीने ग्रामीण भागातील महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या विविध वस्तुंचे प्रदर्शन व विक्री साठी 26 ते 31 जानेवारी दरम्यान आयोजित हिरकणी हाट चे उद्घाटन सौ.अदिती देशमुख यांच्या हस्ते पालकमंत्री अमित देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये क्रिडा संकुल येथे झाले.
जिल्हा क्रीडा संकुल मैदानावर 26 ते 31 जानेवारी 2021 या कालावधीत या हिरकणी हाट च्या माध्यमातून महिला बचत गटाच्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे. याच दरम्यान रोज सायंकाळी ७ वाजता विविध सांस्कृतीक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. यावेळी येथील लावलेल्या प्रत्येक स्टॉलला पालकमंत्री श्री.देशमुख यांनी सपत्नीक भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषदचे अध्यक्ष राहूल केंद्रे, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, प्रकल्प संचालक संतोष जोशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
या हिरकणी हाट मध्ये महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या दर्जेदार अभिनव अशा वस्तुंचे प्रदर्शन व विक्री होणार आहे.या कार्यक्रमाच्या दरम्यान रोज सायंकाळी 7.00 वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 26 जानेवारी रोजी पोवाडा/ शिवगिते, 27 जानेवारी रोजी मराठी गाणी व लोकगितांचा मेहंदीच्या पानावर हा कार्यक्रम, 28 जानेवारी रोजी गीतरामायण, 29 जानेवारी रोजी अभंगवाणी/ भजनसंध्या आणि 30 जानेवारी रोजी संगीत रजनी व खेळ रंगीला पैठणीचा हे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मात्र 26 जानेवारी ते 31 जानेवारी या कालावधीत क्रीडा संकुलाच्या मैदानावर महिला बचत गटांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री रोज सकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत राहणार आहे. लातूरकरांसाठी हे प्रदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम एक मेजवाणीच ठरणार असल्याने लातूर जिल्ह्यातील नागरिकांनी या उपक्रमास भेट देण्याचे आवाहन करण्यात येत आहे.