3 लाख 51 हजार शेतकऱ्यांना 225 कोटीचा निधी वितरित – पालकमंत्री अमित देशमुख
लॉकडाऊन मध्ये वीस लाखांपेक्षा अधिक लाभार्थ्यांना गहू व तांदळाचे नियमितपणे वितरण
लातूर (प्रतिनिधी) : ऑक्टोबर 2020 या कालावधीत जिल्ह्यात अतिवृष्टी व पुरामुळे 2 लाख 50 हजार हेक्टर वरील शेती पिकांचे नुकसान झाले. त्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन प्रशासनाने शासनाकडे 250 कोटीच्या निधीची मागणी केली व सदरचा निधी प्राप्त झाला व त्यापैकी 3 लाख 51 हजार शेतकऱ्यांना 225 कोटीचा निधी वितरित झालेला असून 90 टक्के शेतकऱ्यांना दोन हप्त्यात त्यांच्या बँक खात्यावर निधी वितरित झाला असून उर्वरित निधीचे ही वितरण त्वरित केले जाणार आहे. तसेच अतिवृष्टी व पुरामुळे शेतजमीन खरडून व वाहून गेल्याने 2 हजार 300 शेतकऱ्यांचे एक हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले होते त्याकरिता 3 कोटी 42 लाख रुपये उपरोक्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करून शासनाने अशा नैसर्गिक आपत्ती च्या परिस्थितीत शेतकऱ्यांना वेळेत मदत करून दिलासा दिला आहे. व हे शासन शेतकऱ्यांच्या सदैव पाठीशी असल्याची खात्री दिली असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.
येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी ते मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्यकार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपाध्यक्ष भारतबाई साळुंके, लातूर महापालिकेचे महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपमहापौर चंद्रकांत बिराजदार,माजी आमदार वैजनाथ शिंदे, आयुक्त देविदास टेकाळे, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उप जिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, यांच्यासह सर्व शासकीय विभाग प्रमुख व अन्य मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री देशमुख पुढे म्हणाले की, महाराष्ट्र राज्य कृषी क्षेत्रात अग्रेसर राहावे म्हणून ऊर्जा विभागाने राज्यातील प्रत्येक कृषी पंप विज ग्राहकाला त्याच्या मागणीप्रमाणे वीज जोडणी चा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी नवीन कृषी पंप विज जोडणी धोरण 2020 जाहीर केलेले आहे. त्यानुसार कृषी पंपाच्या वीज बिलातही सवलत देण्यात येत असून प्रथम वर्षी सुधारित थकबाकीच्या 50 टक्के रक्कम भरल्यास वीज बिल कोरे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आपले राज्य कृषिप्रधान राज्य असून शेतकरी हा देशाचा पाठीचा कणा आहे. बळीराजाचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने या योजनेचा लाभ शासन व प्रशासनातील सर्व घटकांनी शेतकऱ्यापर्यंत पोहोचवावा आणि शेतकऱ्यांनीही या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 72 हजार शेतकरी पात्र असून 57 हजार 600 शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. यापैकी 56 हजार 400 शेतकऱ्यांना 332 कोटी लाभाची रक्कम बँक खात्यावर हस्तांतरीत झालेली आहे. तसेच लॉकडाउन मध्ये जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसमोर कापूस विक्रीचा प्रश्न निर्माण झाल्याने शासनाने 17 वर्षानी पानगाव येथे कापूस खरेदी केंद्र सुरु केले. व सर्व शेतकऱ्यांचा 39 हजार क्विंटल कापसाची खरेदी केली. या वर्षीच्या चालू हंगामात 8 जानेवारी 2021 पासून 780 शेतकऱ्यांचा 22 हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात येऊन शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे. जिल्ह्यात प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन अभियानाचा सन 2019-20 मध्ये 12 हजार 500 हेक्टर क्षेत्रासाठी 24 कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून आज पर्यंत 4 हजार लाभार्थ्यांच्या अडीच हजार हेक्टर क्षेत्रासाठी सात कोटीचे अनुदान वितरित करण्यात आलेले आहे, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगितले.
मागील वर्षभरापेक्षा अधिक काळ संपूर्ण जगात कोवीड-19 विषाणूने थैमान घातलेले आहे. आपला देश व संपूर्ण राज्यात कोवीड विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झालेला होता. शासन व प्रशासनाने राबवलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना मुळे हळूहळू कोरोना बाधित रुग्ण संख्या कमी होऊन सध्या ती अत्यंत कमी झालेली आहे. जिल्ह्यात सुमारे 2 लाख कोरोना चाचण्या झालेल्या आहेत, तर सध्या 484 कोरोना बाधित रुग्ण असून त्यातील 50 टक्के रुग्ण हे होम आयसोलाशन मध्ये आहेत, असे पालकमंत्री देशमुख यांनी सांगून आपल्या जिल्ह्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 95 टक्के पेक्षा अधिक आहे. व ही अत्यंत समाधानाची बाब आहे. आपल्या देशातच तयार झालेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसी उपलब्ध झालेल्या असून त्यानुसार दिनांक 16 जानेवारी 2021 पासून संपूर्ण देशभरात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू झालेली आहे. पहिल्या टप्प्यातील लसीकरणाची मोहीम जिल्ह्यातील 6 केंद्रावर आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी सुरु झालेली आहे. लवकरच संपूर्ण राज्य व जिल्हा कोरोना मुक्त होईल, परंतु कोराना चा विषाणू संपूर्णपणे हद्दपार होईपर्यंत नागरिकांनी प्रतिबंधात्मक उपाय योजना अंतर्गत दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.
जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना व यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना अंतर्गत मागील तीन वर्षात 23 हजार 200 घरकुले मंजूर करण्यात आलेली असून त्यासाठी प्रत्येकी शासनाकडून 1 लाख 20 हजारांचे अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. उपरोक्त योजनांतर्गत जिल्ह्यात आज पर्यंत 16 हजार घरकुले पूर्ण झालेली आहेत व उर्वरित ही लवकरच पूर्ण होतील. बेघर लोकांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही श्री.देशमुख यांनी दिली.
लॉकडाऊनमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत जिल्हयातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व एपीएल शेतकरी योजना अशा एकूण 20 लाखापेक्षा अधिक लाभार्थ्यांना गहू व तांदूळ या अन्नधान्याचे वितरण नियमितपणे करण्यात आलेले आहे. तसेच जिल्हयातील 19 शिवभोजन केंद्रामार्फत प्रतिदिन 2 हजार थाळयांचे वितरण झाले व जिल्हयातील एक ही गरजू लाभार्थी अन्नधान्य व शिवभोजन थाळीच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता प्रशासनाकडून घेण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री देशमुख यांनी दिली.
जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद समाज कल्याण विभाग, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व एलिम्को यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव सहाय्यक उपकरणे मिळवण्यासाठी तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या मोहिमेअंतर्गत एकूण 11 हजार 887 दिव्यांगांची तपासणी करण्यात आली. त्याअंतर्गत जवळपास 9 हजार दिव्यांगांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री यांच्या उपस्थितीत ऑनलाईन पद्धतीने कृत्रिम साहित्य व अवयवांचे वितरण करण्यात आले व अशा दिव्यांगाना मुख्य प्रवाहात आणण्याचा एक चांगला प्रयत्न करण्यात आला असल्याचे श्री देशमुख यांनी सांगितले.
आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. व आपण 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना स्वीकारून ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आणली. याच दिवशी भारतीय राज्यघटना अंमलात आणण्याचा मुख्य उद्देश म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीपूर्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 रोजी लाहोर अधिवेशनात प्रथमच संपूर्ण स्वराज्याची मागणी केली होती, अशी माहिती पालकमंत्री देशमुख यांनी देऊन भारतीय लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना ज्या समितीने तयार केली त्या घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान निर्मितीमध्ये बहुमोल योगदान लाभले. नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या आपल्या भारत देशाने 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशभरात उत्साहाने साजरा केला जातो,असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण झाले. त्यानंतर पालकमंत्री यांनी परेड कमांडर पोलीस उपाधिक्षक दिनेश कोल्हे यांच्या समवेत परेडचे निरीक्षण करून परेड संचलनास परवानगी दिली. त्यानंतर शासनाच्या विविध विभागांनी नेत्यांच्या विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना प्रबोधनात्मक कार्यक्रमाची माहिती चित्ररथाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना देण्यात आली. त्यानंतर शहीद सैनिकांच्या अवलंबितांना शासकीय अनुदानाची रक्कम व ताम्रपट प्रदान करून पालकमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते सन्मानित आले व त्यानंतर महसूल विभाग, पोलीस विभाग ,आरोग्य विभाग समाज कल्याण, विभाग महावितरण व विविध रूग्णालयाला सन्मानपत्र, प्रशस्तीपत्र व मानचिन्ह देऊन पालकमंत्री देशमुख यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
त्यानंतर पालकमंत्री देशमुख यांनी भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 71 व्या वर्धापन दिनानिमित्त येथे उपस्थित असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नागरिक, पदाधिकारी, अधिकारी पत्रकार यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संवाद तज्ञ उद्धव फड यांनी केले. यावेळी लातूरकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.