विरोधी नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे महाविकास आघाडीचे कारस्थान
भाजपा जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांचे प्रतिपादन
लातूर (प्रतिनिधी) : तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करून विरोधी पक्षाच्या नेत्यांना बनावट पुराव्याच्या आधारे खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे सत्ताधारी महाविकास आघाडीचे कारस्थान विरोधी पक्षनेते मा. देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणले आहे. विरोधकांना नष्ट करून लोकशाही उध्वस्त करण्याच्या या धक्कादायक प्रकाराची सीबीआय चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केली आहे.
भारतीय जनता पार्टीचा लोकशाही पद्धतीने मुकाबला करता येत नाही म्हणून राज्यातील महाविकास आघाडीच्या ‘साहेबां’नी सरकारी वकिलामार्फत पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल, सुभाष देशमुख यांना गुन्ह्यांमध्ये अडकविण्यासाठी रचलेले कारस्थान आता उघड झाले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या पुराव्यांमध्ये सरकारी वकिलाने महाविकास आघाडी सरकार मधील मंत्र्यांच्या गैरव्यवहारांचीही कबुली दिली आहे. हा सर्व प्रकार धक्कादायक असून राज्य सरकारच्या यंत्रणेचा विरोधकांना संपविण्यासाठी दुरुपयोग करण्यात येत आहे. या प्रकारात पोलीस गुंतले असल्याने याची चौकशी सीबीआयकडूनच करायला हवी अशी मागणी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशअप्पा कराड यांनी केली आहे.
विधानसभा निवडणुकीनंतर जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने आता राज्यातील लोकशाही उध्वस्त करण्याचे प्रयत्न चालविले आहेत. विरोधी नेत्यांना गुन्हेगार ठरविण्यासाठी कारस्थाने करणे, त्यासाठी तपासी यंत्रणांचा दुरुपयोग करणे, दाऊदशी व्यवहार करणाऱ्या मंत्र्याला पाठिंबा देणे जनतेच्या प्रश्नासाठी आंदोलने करणाऱ्या कार्यकर्त्यांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्यांना अडकविणे, सरकारविरोधात मत व्यक्त करणाऱ्या नागरिकांवर हल्ले करणे आणि त्यांना पोलीस केसमध्ये अडकविणे असे प्रकार चालू आहेत असे सांगून आ. रमेशअप्पा कराड म्हणाले की, राज्यात लोकशाही संकटात आहे. अराजकता निर्माण होत आहे या विरोधात भारतीय जनता पार्टी येत्या काळात संघर्ष करेल असे बोलून दाखविले.