बाजार समीतीतील कडता बंद करा अन्यथा चोवीस मार्च रोजी कार्यालयास टाळे ठोकणार
औसा (प्रतिनिधी) : औसा कृषी उत्पन्न बाजार समीतीमध्ये शेतीमाल विक्रीसाठी आलेल्या मालातून प्रतिक्विंटल २-३ किलो शेतीमाल कडता म्हणून बेकायदेशीरपणे घेतला जात आहे.या विरोधात शेतकरी संघटनेने विस मार्च पर्यंत ही पद्धत बंद नाही केल्यास कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे.
शेतकऱ्यांचे कोणत्याही प्रकारची लूट होऊ नये, सर्व व्यवहार पारदर्शक व्हावे यासाठी कृषी उत्पन्न खरेदी विक्री अधीनियम १९६३ नुसार बाजार समीतीचा व्यवहार करण्याचे बंधनकारक असताना मात्र औसा बाजार समीतीत नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे.कारण विक्रीसाठी आलेल्या शेतीमालातुन प्रतिक्वींटल सुमारे दोन ते तिन किलो कडता म्हणून शेतीमाल घेतला जात आहे.यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे.या विरोधात शेतकरी संघटनेने अनेक वेळा निवेदन देऊन ही लूट थांबविण्यासाठी कळविले आहे.परंतु बाजार समीती प्रशासन याबाबत उदासीन आहे असा आरोप संघटनेने केला आहे.
ही शेतकऱ्यांची लूट विस मार्च पर्यंत बंद करून समाधानकारक परिणाम नाही दिसल्यास चोवीस मार्च रोजी समितीच्या प्रशासकीय कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा शेतकरी संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष रुपेश शंके, कार्याध्यक्ष बालाजी जाधव, युवा नेते अजिंक्य पाटील, तानाजी माने, सचिन पुरी,करण भोसले आदिंनी दिला आहे.
