एकतर्फी प्रेमातून मुलीवर चाकूहल्ला
पुणे (रफिक शेख) : एकतर्फी प्रेमातून शाळकरी मुलीवर शाळेच्या आवारातच घुसून चाकूने भोसकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना वडगाव शेरी येथे सोमवारी तिला सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. या गंभीर घटनेनंतर या तरुणाने विष प्राशन करून स्वतःवर वार करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मुलगी ‘नाही’ म्हणते, म्हणजे ‘नाही’च असते, हे आजकालच्या मुलांना कळणार तरी कधी? आणि हा प्रश्न परीक्षेत विचारणार तरी कधी? या घटनेमुळे असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. या मुलीची परीक्षा मंगळवारी सुरू होणार होती; पण तिला आता परीक्षेला मुकावे लागणार आहे.
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपी कपिल भट (२२, रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) याच्याविरुद्ध (पोस्को) बाललैंगिक अत्याचारासह, खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दोघांवरही खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वडगाव शेरी येथील इनामदार हायस्कूल येथे दहावीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ होता. यावेळी कपिल भट याने शाळेच्या आवारात आला. त्याने या मुलीला बाहेर बोलावले. तिला आवारात बाजूला घेऊन जात माझ्याशी बोलत का नाही, मला फसविले, असे म्हणून त्याने तिच्या पोटात चाक खुपसला. तिच्या मनगटावरही त्याने वार केला. अचानक घडलेल्या या प्रकाराने शिक्षक आणि विद्यार्थी घाबरले. तिच्यावर वार करून भट पळून गेला. रक्तबंबाळ अवस्थेत तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे तसेच हाताच्या मनगटाची शीरदेखील कापली गेली आहे. त्यामुळे पुढील उपचारासाठी पुण्यातील मोठ्या खासगी रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. या तरुणाचा शोध सुरू झाला.
