सालगड्याच्या मुलीचे लोक झाले मायबाप.. !

सालगड्याच्या मुलीचे लोक झाले मायबाप.. !

समाज माध्यमाने केले गरीबाच्या गुणवंत मुलीच्या वैद्यकीय शिक्षणाचे स्वप्न पूर्ण

अहमदपूर (गोविंद काळे) : रामेगाव ता. चाकुर येथील एका सालगडयाच्या मुलीचा शासकीय वैद्यकीय शिक्षणाचा ( एम.बी.बी.एस. ) प्रवेशाचा मार्ग समाज माध्यमामुळे सुलभ झाला असुन आज अहमदपूर येथील संस्कृती मंगल कार्यालयात संपन्न झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात समाजसंकलित निधी रू. ३,००००० ( तीन लाख ) गरजू गुणवंत मुलीला प्रदान करण्यात आला. या विषयीची सविस्तर माहीती अशी की, रामेगाव ता. चाकुर येथील रहिवासी असलेले भरत कदम हे लेकरांच्या शिक्षणासाठी गेली दहा वर्ष अहमदपूर येथे सालगडी म्हणून शेतीत काम करतात. त्यांची मुलगी कु.आरती हिने १२वी चा अभ्यास अतिशय बिकट व प्रतिकुल परिस्थिती मध्ये पुर्ण करून ‘नीट’ परिक्षेत ५४९ गुण मिळवून जळगाव येथील उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळविला. तिने जरी बापाच्या कष्टाचे चिज केले तरीही पुढे प्रश्न मोठा होता. प्रवेशाची रक्कम तिन लाख चाळीस हजार रू. हे तिला तिच्या कुवतीपेक्षा जास्त व डोंगराऐवढी वाटल्याने तिने वैद्यकीय प्रवेशाचा नाद सोडला. सदर प्रवेशाचा डि.डी.काढण्यास अवघा एक दिवसाचा अवधी असताना येथील सामाजीक कार्यकर्ते तथा मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.गोविंदराव शेळके सरांच्या कानावर हि बातमी गेली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखुन शेळके सरांनी संबंधीत मुलीच्या कुटूंबीयांची चर्चा करून तातडीने समाज माध्यमावर गरीबाच्या लेकीचे मायबाप होण्याचे आवाहन केले. यानंतर अनेक राजकीय, सामाजीक व संवेदनशील कार्यकर्ते त्या मुलीचे मायबाप होण्यास पुढे सरसावले. या देणगीचा सेवारंभ महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब जाधव साहेब यांच्या शुभदेणगी मधुन झाला. तद्नंतर हा जगन्नाथाचा रथ ओढण्यास अनेक हात पुढे सरसावले. त्यातून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष अखंड मदतीचा ओघ सुरू होऊन देण्याऱ्याचे हाजारो हात पुढे आले. अशा प्रकारे सर्व मार्गाने जमा झालेला जवळपास तीन लाख रूपयाचा निधी आरती कदम व त्यांच्या कुटूंबीयांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. विशेष म्हणजे या सत्कार्यास सर्वच स्तरातून देणगी मिळाली. त्यामधुन गरीबाच्या लेकीच्या वैद्यकीय शिक्षणाची ( एम.बी.बी.एस. ) मुहूर्तमेढ रोवली गेली. शिवाय समाजामध्ये अजून माणुसकी जिवंत आहे याची प्रचिती आली. विविध स्तरातून समाज माध्यमांचे व विद्यार्थीनींचे कौतूक केले जात असुन समाज माध्यमाचा असाही चांगल्या कामासाठी उपयोग होऊ शकतो हे पुन्हा एकदा सिद्ध झाले. यावेळी माजी आमदार बब्रुवान खंदाडे, प्रा.गोविंद शेळके, डॉ.पी.एस. कदम, ओम गॅस एजन्सीचे महेंद्र खंडागळे, महेश बॅंकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, डॉ.पदातूरे, मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष आशोक चापटे, किलबिल नॅशनल स्कुलचे संचालक ज्ञानोबा भोसले, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष भिमराव ( नाना ) कदम, जि.प. सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रणजीत चौधरी, सामाजिक कार्यकर्ते कोतावार सावकार, दयानंद घाटोळ, सचिन जगताप, प्रविण डांगे, गंगाधर याचवाड, सोपान कदम, शिवशंकर लांडगे, सिद्धार्थ दापके, श्रीधर तराटे, प्रदीप फुलसे, माजीद शेख, उस्मान खुरेशी, विरेंद्र पवार व तसेच मुलीचे आई, आजोबा यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते व देणगी दाते आदींची उपस्थिती होती.

About The Author

error: Content is protected !!