तुकारामांच्या अध्यात्मातून जीवनाची शिकवण मिळते – ह.भ.प.डॉ. अनिल मुंढे महाराज
अहमदपूर (गोविंद काळे) : ‘आम्ही जातो अमुच्या गावा आमुचा राम राम घ्यावा’ या निरोपासमयीच्या निरूपणात्मक अभंगांचे अभ्यासपूर्ण विवेचन केल्यानंतर ‘संतश्रेष्ठ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगाच्या माध्यमातून चराचरातल्या जीवधारींनी कसे जगावे? कसे जगावे? संकटातून मार्ग कसा काढावा ? आदिची शिकवण दिली असून त्यांच्या संत तुकाराम महाराजांच्या अध्यात्मातून जीवनाची खरी शिकवण मिळते असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाच्या मराठी विभागातील प्रा. ह. भ. प. डॉ. अनिल मुंढे महाराज यांनी केले .
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ते महात्मा फुले महाविद्यालयात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संत तुकाराम महाराज बीज या कार्यक्रमानिमित्त बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नागराज मुळे हे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून महाराष्ट्रातील ख्यातनाम प्रवचनकार ह.भ.प. प्रा. डॉ. अनिल मुंढे महाराज यांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष फुलारी व प्रवीण वाघमारे हे उपस्थित होते.
याप्रसंगी आपल्या प्रवचनात पुढे बोलताना डॉ.अनिल मुंढे म्हणाले की, तुकाराम महाराजांनी आपल्या जीवनात प्रचंड संघर्ष केला सनातनी आणि मनू प्रवृत्तीच्या लोकांकडून त्यांचा वारंवार छळ होत राहिला. परंतु त्यांनी विवेकनिष्ठ, विज्ञाननिष्ठ विचारांच्या माध्यमातून समाज जागृतीचे कार्य शेवटपर्यंत केले. श्री संत तुकाराम महाराज यांनी छत्रपति शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी आणि स्वराज्याच्या विस्तारासाठी मोलाचे सहकार्य केले.मुगल कालीन राजवट उलथून टाकण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आणि त्या शक्तीला संत तुकाराम महाराजांच्या भक्तीचा संयोग घडून आला, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रा.डॉ. नागराज मुळे यांनी केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा. डॉ. बब्रुवान मोरे यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. पांडुरंग चिलगर यांनी मानले. यावेळी ‘कोव्हिड-१९’ च्या नियमांचे पालन करीत महाविद्यालयातील प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते.
