धुलिवंदनाच्या दिवशी खाद्यपदार्थ बनवण्यासाठी शिवारात गेलेल्या चार मित्रापैकी एकाचा तलावात बुडून मृत्यु
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील चार युवक सकाळी धुलिवंदनाचा रंग खेळून खाद्यपदार्थ शिजवुन खाण्यासाठी अहमदपूर – आनंदवाडी (काळेगाव) रोडवरील आनंदवाडी शिवारातील साठवण तलाजवळ गेले असता तलावातील पाण्यात हात पाय धुण्यास जाऊन एकाचा जागीच मृत्यु झाल्याची घटना दि १८ मार्च रोजी घडली असुन अहमदपूर पोलीसांत आकस्मित मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
याविषयी सविस्तर माहीती अशी की अहमदपूर येथील उमर कॉलनीतील मोंढ्याच्या पाठीमागे दगडी वस्तू तयार करून उदरनिर्वाह करणाऱ्या होनवडज ( ता . मुखेड , जि . नांदेड ) येथील काही कुटुंबाची अस्थाई वस्ती आहे. या वस्तीतील अभिजित यल्लपा मोरे ( वय २२ ) हा आपल्या इतर तीन मित्रांसह अहमदपूर शहरात सकाळी रंग खेळून अकरा वाजण्याच्या आसपास शहरापासुन जवळच असलेल्या आनंदवाडी (काळेगाव) शिवारातील साठवण तलावाजवळ खाद्यपदार्थ बनवण्याचे साहित्य घेऊन गेला खाद्यपदार्थ बनवण्यापूर्वी हातपाय धुऊन घ्यावे म्हणून प्रत्येक जण तलावात तीन ते चार फूट अंतरावर जाऊन हातपाय धुवून वापस आले परंतु अभिजीत हात धुण्यासाठी तलावामध्ये थोडासा अंतर अधिक गेला जातेवेळेस सुखरूप गेलेल्या अभिजीतला वापस येताना तोच रस्ता लक्षात आला नाही. गेलेल्या रस्त्याच्या थोड्या फरकाने वापस येताना रस्त्यात असलेल्या आठ ते दहा फूट खोल खड्यात तो बुडाला दरम्यान सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यामुळे जवळच असलेला एक व्यक्ती तिथे पळत आला. परंतु त्यालाही पाण्यात पोहता येत नसल्यामुळे अभिजीतचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या संदर्भात अहमदपूर पोलिस ठाण्यात सिआरपिसी १६/२२ नुसार आकस्मिक मृत्यूचा गुन्हा नोंद झाला असून पोलीस निरीक्षक चितंबर कामठेवाड , सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप केंद्रे हे पुढील तपास करीत आहेत. सदरील मृतदेह काढण्यासाठी पोलीस उप- निरिक्षक बालाजी पल्लेवाड, पोकॉ प्रशांत किर्ते, पोकॉ बेंबडे नारायण, पोहेकॉ व्ही.जी संमुखराव आग्निशामन दलाचे कर्मचारी कांबळे व त्यांचे सहकारी आदींनी मदतकार्य केले.
