माती,माता आणि मातृभूमी मुळे व्यक्तित्व घडते – डॉ. राजकुमार यल्लावाड
अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात विविध कार्यक्रमांनी मराठी संवर्धन पंधरवाडा संपन्न.
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठी भाषेला खूप मोठा इतिहास आहे .व्यक्ती फक्त आपल्या मातृभाषेतूनच अभिव्यक्त होत असतो.मातृभाषा ज्याला नीटनेटकी येते, तो इतर भाषेचाही अभ्यासक होऊ शकतो. कारण व्यक्तीच्या व्यक्तित्वाची जडणघडण ही मातृभाषेतूनच होते जो व्यक्ती माती, माता आणि मातृभाषेला विसरत नाही तो जीवनात यशस्वी होतो. असे प्रतिपादन मराठी भाषा व साहित्याचे गाढे अभ्यासक प्रा .डॉ . राजकुमार यल्लावाड यांनी केले.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूर येथील महात्मा फुले महाविद्यालयात आभासी तथा दूरदृश्य (झूम ) प्रणालीच्या माध्यमातून ‘ मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ‘ चे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांनी करण्यात आले होते.
या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ .डी. डी. चौधरी हे होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून परळी येथील लक्ष्मीबाई देशमुख महिला महाविद्यालयाचे मराठी विभाग प्रमुख तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी सदस्य प्रा. डॉ. राजकुमार यल्लावाड हे उपस्थित होते . आभासी तथा दूरदृश्य (झूम ) प्रणालीच्या माध्यमातून ते पुढे बोलताना म्हणाले की ,संता महंतांनी व साहित्यकार यांनी मराठीत चिरंजीवी अक्षय साहित्य निर्माण केले आहे. पाश्चात्य विचारकांनी ही मराठीची महती मान्य केली आहे .जोपर्यंत कष्टकरी, शेतकरी मराठी भाषेचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करीत राहील, तोपर्यंत मराठी भाषा नेस्तनाबूत होऊ शकत नाही. आज पर्यंत विविध भाषांचे, परकीय सत्तेचे व त्यांच्या संस्कृतीचे आक्रमण मराठीवर झाले तरीही मराठी भाषेचा व साहित्याचा इतिहास वैभवशालीच राहिला आहे. आजच्या महाजाल अर्थात इंटरनेटच्या युगात मराठी मोठ्या दिमाखाने जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा म्हणून वावरत आहे .परंतु आजच्या संगणकाच्या संक्रमण काळात मराठी भाषा व मराठी संस्कृतीचे जतन करण्याची व तिला वैभवाच्या शिखरावर पोहोचविण्याची जबाबदारी युवकांची आहे . असेही ते म्हणाले .
मराठी भाषा संवर्धन पंधरवडाच्या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोपा प्रसंगी उपप्राचार्य डॉ. डी. डी. चौधरी यांनी म्हटले की , अभिजात साहित्याचे दालन मराठी आहे. संत, महंत , साहित्यकार व राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी मराठीला राजभाषेचा दर्जा दिला. या सर्वांचे मराठी भाषेच्या संवर्धनात महत्त्वाचे योगदान आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ. माराती कसाब यांनी केले तर आभार ह.भ.प. प्रा. डॉ.अनिल मुंडे यांनी मानले. या कार्यक्रमास तांत्रिक साह्य संगणकतज्ज्ञ ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे यांनी केले.आभासी तथा दूर दृश्य (झूम ) प्रणालीच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद च्या मराठी अभ्यास मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सरकटे यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी व मराठी भाषाप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.