देशाच्या अरोग्यासाठी शेतकरी बांधवांनो विषमुक्त शेती करा – कृषिरत्न आबासाहेब मोरे

देशाच्या अरोग्यासाठी शेतकरी बांधवांनो विषमुक्त शेती करा - कृषिरत्न आबासाहेब मोरे

चाकुर (गोविंद काळे) : रासायनिक खताचा, कीटकनाशकाचा, तणनाशकाचा वापर करून जमीन ही नापिकी झाली आहे. आपल्या भूमातेला काळ्‍या आईला रोगापासून वाचविण्यासाठी व देशाचे आरोग्य घडविण्यासाठी शेतकरी बांधवांनो विषमुक्त शेती करा असे आवाहन श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक मार्ग दिंडोरी प्रणित कृषी शास्त्र विभागाचे प्रमुख कृषिरत्न गुरुपुत्र आबासाहेब मोरे यांनी केले.
चाकुर येथील सावली फाऊंडेशन चारलिंब,येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ-त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग ( दिंडोरी प्रणित) अंतर्गत कृषी शास्त्र विभाग आयोजित,जागतिक कृषी महोत्सव २०२१ चे चाकुर येथे आयोजन करण्यात आले होते.यावेळी उद्घाटक म्हणून आबासाहेब मोरे शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
व्यासपीठावर भाजपाचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाक्के,भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बालाजी पाटील चाकुरकर,आदर्श ग्रामपंचायत अलगरवाडीचे सरपंच गोविंदराव माकणे, नगराध्यक्ष सिध्देश्वर पवार, चाकुरचे उपनगराध्यक्ष नितीन रेड्डी,नगरसेवक अ‍ॅड संतोष माने आदीची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आबासाहेब मोरे म्हणाले की निसर्गाची जाणिव ठेवुन विज्ञानाची सांगड घालत शेती करणे काळाची गरज आहे,वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रगती साधता नविन तंत्रज्ञानाचा वापर करत पारंपारिक गावरान बि-बियाने वापरुन पोषणयुकत व विषमुक्त अन्न पिकवावे व ते खाण्यावर भर द्यावा सेंद्रिय शेतीकडे वळावे.उत्तम शेती,मध्यम व्यापार,कनिष्ठ नोकरी ही बिरुदावली परत आणण्यासाठी कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न देणारी विषमुक्त शेती करावी.
बांधावर झाडे आणि गोठ्यात गाय असल्या शिवाय शेतकरी प्रगती करू शकणार नाही.गावरान बियाणे वापरा सेंद्रिय व नैसर्गिक शेती करा.घरात विषमुक्त अन्न खाल्ले तरच आपण वाचू शकतो गावात येणारा भाजीपाला व अन्न विषमुक्त असेल तरच आपण अनेक रोगांवर प्रतिकार करू शकतो.निरोगी माणूसच देशाचे भविष्य घडवू शकतो.शुद्ध हवा,शुद्ध पाणी आणि स्वच्छता याची आता नितांत गरज भासत आहे. गावातच आपल्याला सर्व निर्माण करता येते आपल्या गावाला स्वावलंबी बनवता येतं व गावातच स्वयंरोजगाराची निर्मिती करता येते गावाला तीर्थक्षेत्र करा इतर कुठल्याही तीर्थक्षेत्रावर जाण्याची किंवा कोणी बुवा बाबा गंडेदोरे करण्याची तुम्हाला गरज भासणार नाही.
भविष्यकाळात पुढच्या पिढीला वाचविण्यासाठी अनेक रोगापासून दूर ठेवण्यासाठी विषमुक्त शेती हाच एकमेव पर्याय आहे.आज माणूस माणसापासून दूर जात आहे कुटुंबासाठी भाकरी कामावने खूप मोठी गोष्ट नाही पण ती कमवलेली भाकरी एकत्र बसून खाणे फार मोठी गोष्ट आहे.
विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी पंचमहाभूता समोर आजही विज्ञानाचे काही चालत नाही स्वतःच्या समाधानासाठी संस्कार अत्यंत आवश्यक आहेत ज्ञान,दान,शास्त्र याचे महत्त्व येणाऱ्या पिढीला समजून सांगणे गरजेचे आहे संस्कृती साहित्य आणि प्रदर्शन आपल्या आयुष्यामध्ये अत्यावश्यक असल्याचे कृषिरत्न आबासाहेब मोरे यांनी सांगितले.
यावेळी समस्त,ग्रामस्थ, शेतकरी बांधवांना कृषी, विवाह,ग्रामदैवत,सेंद्रिय देवता,बालसंस्कार, देव-देव्हारा मराठी अस्मिता, जनकल्याण आदि विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ,शेतकरी वर्गाकडून खुप उत्स्फुर्त पणे प्रतिसाद दिला.महिला वर्गासाठी हळदी कुंकू कार्यक्रम ठेवण्यात आला होता.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.मारोती बुद्रुक पाटील यांनी तर आभार गजानन करेवाड यांनी मानले.
जागतिक कृषी महोत्सव संपन्न करण्यासाठी चाकूरचे सेवेकरी बालाजी मद्रेवार,बालाजी करेवाड, भगवान करेवाड, वनमाला निला, अंबादास करेवाड, ज्ञानेश्वर कासार,गणेश पैंजणे संतोष माडगे, दैवशाला करेवाड,वंदना सुर्यवंशी, सारीका गोचडे, आदि चाकुर केंद्रातील महिला व पुरुष सेवेकरी यांनी सहकार्य केले.

About The Author