धक्कादायक; ज्येष्ठ नागरिकाला १० लाखाला फसविले
पुणे (प्रकाश इगवे) : शेअर मार्केटमधील तज्ज्ञ असून, १० लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास दरमहा वीस हजार रुपये देण्याचे आमिष दाखवून कोणताही मोबदला न देता ज्येष्ठ नागरिकाची सुमारे १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करून, एका महिन्याच्या आत केली. अहवाल सादर करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जान्हवी केळकर यांनी कोथरूड पोलिसांना दिले आहेत.
याप्रकरणी ८७ वर्षीय निवृत्त शिक्षण अधिकाऱ्यांनी अॅड. हेमंत झंजाड, अॅड. प्रदीप दिघे यांच्यामार्फत समाधान ज्ञानेश्वर कांबळे (रा. वारजे) यांच्या विरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला आहे. तक्रारदार हे निवृत्त झाल्यानंतर पुण्यामध्ये स्थायिक झाले होते. त्यावेळी कांबळे याने त्यांना तो शेअर मार्केटामधील तज्ज्ञ असल्याचे सांगितले. तक्रारदार यांनी शेअर मार्केटमध्ये १० लाख रुपये गुंतवले, तर दरमहा २० हजार रुपये देईन, तसेच मुद्दल परत करीन, असे लेखी करारनामा करून आश्वासन दिले. १० लाख रुपये स्वीकारून कोणताही मोबदला न देता तक्रारदारांची फसवणूक केली. त्याच्याकडे वेळोवेळी पैशांची मागणी करूनदेखील त्याने पैसे परत केले नाहीत. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेत तक्रार दाखल केली.
तक्रारदार यांनी निवृत्तीनंतरचे सर्व पैसे कांबळेला दिलेले आहेत. गुंतवणूक केलेल्या रकमेचा करारनामा करून, देऊनही एकही रुपया परत न करता तक्रारदारांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे. तक्रारदार हे ज्येष्ठ नागरिक असून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांना पैशांची नितांत गरज आहे. तसेच त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला नाही तर तो आणखी लोकांची फसवणूक करेल. त्यामुळे त्याच्यावर गुन्हा दाखल करावा, असा युक्तिवाद अॅड. हेमंत झंजाड यांनी केला. न्यायालयाने अॅड. झंझाड यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत कांबळे विरुद्ध गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला.