प्रेमसंबंधातून इंजिनिअरची आत्महत्या; प्रेयसीवर गुन्हा

प्रेमसंबंधातून इंजिनिअरची आत्महत्या; प्रेयसीवर गुन्हा

पिंपरी (रफिक शेख) : लग्नानंतर इंजिनिअर असलेल्या तरुणाला महाविद्यालयातील प्रेयसी अचानक भेटली. त्यानंतर त्यांच्यातील जुने प्रेम पुन्हा बहरले. तिच्याशी लग्न करण्यासाठी त्याने पत्नीला घटस्फोट दिला. मात्र, त्यानंतर प्रेयसीने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने गळफास लावून आत्महत्या केली. याप्रकरणी प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आत्महत्या केलेल्या ३५ वर्षीय इंजिनिअर तरुणाच्या ६४ वर्षीय वडिलांनी याप्रकरणी सोमवारी (दि. ४) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ३२ वर्षीय विवाहितेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणाचे शिक्षण घेताना महाविद्यालयात एका तरुणीशी प्रेमसंबंध जुळले. शिक्षणानंतर मात्र तरुण आणि त्याची प्रेयसी यांची ताटातूट झाली. दरम्यान, इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतलेल्या तरुणाला नोकरी लागली. त्याचे लग्न झाले. त्याला अपत्य प्राप्तीही झाली. सारे काही सुरळीत असताना त्याची आणि महाविद्यालयीन प्रेयसी तरुणाला असलेल्या तरुणीची अचानक भेट झाली. त्याच्या प्रेयसीचेही लग्न झाले होते. तसेच ती प्रेयसी एका बाळाची आईदेखील झाली असल्याचे तरुणाला समजले. मात्र, तरीही जुन्या प्रेमाने उचल खालली.

तरुण इंजिनिअर आणि त्याची प्रेयसी यांच्यातील ‘प्रेम’ पुन्हा बहरले. मात्र, दोघांचेही लग्न झाल्याने त्यांना त्याचा अडसर वाटत होता. दोघांनी लग्न करायचे ठरविले. त्यासाठी तरुणाने त्याच्या पत्नीला आणि त्याच्या प्रेयसीने तिच्या पतीला घटस्फोट देण्याचे ठरले. त्यानुसार तरुणाने पत्नीला घटस्फोट दिला. मात्र, त्याच्या प्रेयसीकडून त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे तरुणाचा भ्रमनिरास झाला. प्रेयसी प्रतिसाद देत नसून त्रास देत आहे, आत्महत्येशिवाय कोणताही पर्याय नाही, असे एका चिठ्ठीत लिहून तरुणाने १३ डिसेंबर २०२१ रोजी हिंजवडी येथे राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या वडिलांनी पोलिसांत नुकतीच तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी ४ एप्रिलला गुन्हा दाखल केला.

About The Author

error: Content is protected !!