कव्हा गावातच रोजगार निर्मितीसाठी अराईज अगरबत्ती उद्योगाची उभारणी – सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वपूर्ण असलेल्या गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अराईज अगरबत्ती उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले.बचत गटाच्या माध्यमातून महिला स्वावलंबी व उद्योजक व्हाव्यात. यासाठी विनातारण कर्ज देवून तब्बल तीन हजार महिलांना उद्योजक बनविण्याचे काम अद्यापपर्यंत केलेले आहे. यापुढील कालावधीतही गावातील महिलांना गावातच रोजगार मिळावा यासाठी गावातच अराईज अगरबत्ती उद्योगाची उभारणी करण्यात आली असून या माध्यमातून रोजगाराची संधी मिळणार असल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा तथा अराईज अगरबत्ती उद्योगाच्या संचालिका सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर यांनी केले.
यावेळी त्या कव्हा येथील अराईज अगरबत्ती उद्योगाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जे.एस.पी.एम.शिक्षण संस्थेचे समन्वयक संचालक निळकंठराव पवार, अशोक पाटील, ग्रामपंचायतीच्या सरपंच पद्मीनताई सोदले, उपसरपंच किशोरदादा घार, एमएनएस बँकेचे संचालक सुभाषअप्पा सुलगुडले, उद्योजक मुळे, नगरसेविका रागिणीताई यादव, माणदेशी फौंडेशनच्या शिवपूजे मॅडम, ग्रामपंचायत सदस्य नामदेव मोमले, सारिका देशमुख, अंजलीताई पाटील, माजी प.स.सदस्य, दिपमाला मस्के, संपत सारगे, राम घार, लक्ष्मण सूर्यवंशी, शिवराज बोयणे, धिरज भैरूमे, नागेश जाधव, नेताजी मस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.कव्हेकर म्हणाल्या की, अराईज अगरबत्तीच्या माध्यमातून बचतगटांच्या महिलांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम केलेले आहे. तसेच कुक्कुटपालन उद्योगाच्या माध्यमातूनही गावातील तरूणांना रोजगार देण्याचे काम केलेले आहे. यापुढील कालावधीतही गावात अनेक उद्योगाची उभारणी करून शहराच्या धर्तीवर कव्हा गावचा चौफेर विकास करण्याचा संकल्प असल्याचेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपसरपंच किशोर घार यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार अब्दुल गालिब शेख यांनी केले. या कार्यक्रमाला 42 बचत गटाच्या महिलासह ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
स्मार्ट व्हिलेजची ओळख कायम ठेवण्यासाठी अनेक उद्योगाची उभारणी करू – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
कव्हा गावचा चौफेर विकास करण्यासाठी आपण सर्वांनी योगदान दिलेले आहे. पोखरा योजनेतून गावासाठी अनेक योजना आणल्या लाखो रूपयांचे सबसीडी मिळाली असून त्या योजनेची सक्षमपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे. एमएनएस बँकेच्या माध्यमातूनही पदवीधर तरूणांना पावनेदोन टक्के कमिशन देवून बीसीएची सेवा देण्याचे काम सुरु केलेली आहे. यापुढील कालावधीतही स्मार्ट व्हिलेज कव्ह्याची ओळख कायम ठेवण्यासाठी अराईज अगरबत्ती उद्योगाबरोबर भविष्यात अनेक उद्योगाची उभारणी करू, असे प्रतिपादन भाजपा नेते तथा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी केले.