शैक्षणिक क्रांतीचा पाया “जी.के. इंटरनॅशनल स्कूल”

शैक्षणिक क्रांतीचा पाया "जी.के. इंटरनॅशनल स्कूल"
शैक्षणिक क्रांतीचा पाया "जी.के. इंटरनॅशनल स्कूल"
शैक्षणिक क्रांतीचा पाया "जी.के. इंटरनॅशनल स्कूल"

उदगीर ( अ‍ॅड.एल. पी. उगिले ) : उदगीर म्हणजेच सीमा भागातील शैक्षणिक पंढरी असे समजले जाते. शैक्षणिक क्षेत्रात उदगिरी शहराने विशेष नाव लौकिक मिळवलेले आहे. त्या शहरात शिक्षणाचा नवीन पॅटर्न घेऊन जी.के. इंटरनॅशनल स्कूल च्या रूपाने आज पासून सुरू होत आहे. संपूर्ण महाराष्ट्राला अचंबित करणारे नवीन प्रयोग जी.के. पी. एस. संस्थेने सुरु केले आहेत. “विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांना शिकवायचे” या प्रयोगातून विद्यार्थी शिकत शिकत शिकवायला आणि खऱ्या अर्थाने शिकायला सुरू करतात! ज्ञानरचनावादाचा मुळ उद्देश हाच आहे की, तुम्ही काय शिकलात? यापेक्षा तुम्ही कसे शिकलात? याला जास्त महत्त्व आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा, ज्ञानपिपासू वृत्ती आणि आत्मविश्वास निर्माण व्हावा. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून रमेश बिरादार एक यशस्वी उद्योजक असतांना देखील त्यांनी सामाजिक जाण ठेवण्यासाठी आणि समाजाचे आपण काही देणे लागतो. तो समाज सुसंस्कृत आणि स्वयंपूर्ण झाला पाहिजे. या उद्देशाने शिक्षणक्षेत्रात कार्य करायचे ठरवून त्यांनी गेल्या बारा वर्षापूर्वी पासून ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल च्या रूपाने लातूर मध्ये पहिली शाळा सुरू केली. दर्जेदार आणि उत्कृष्ट शिक्षण देण्याच्या उद्देशाने त्यांनी भरपूर प्रयत्न केले. विद्यार्थी दर्जेदार घडावा. यासाठी शिक्षण देणारे गुरु सुद्धा समृद्ध आणि उत्कृष्ट असायला हवेत! मात्र सध्या शिक्षणक्षेत्रात मांडल्या गेलेल्या बाजारामुळे आदर्श आणि उच्च दर्जाचे शिक्षण देणारे शिक्षक मिळतीलच याची खात्री नसल्याने, त्यांनी नवीन प्रयोग करायला सुरुवात केली. सुरुवातीला या नव्या प्रयोगाला काही प्रमाणात विरोध झाला. कारण पारंपारिकता सोडून नव्या वळणाला जाताना खडखडाट होतोच, तशाच पद्धतीचा हा खडखडाट सुरु झाला होता. पालकतूनही काही प्रमाणात ओरड होऊ लागली होती. मात्र थोड्या दिवसात जेव्हा त्याचे निकाल समोर येऊ लागले तेव्हा मात्र पालक आणि समाजही अचंबित झाला! त्यांनी या प्रयोगाचे स्वागत केले. कारण या नव्या प्रयोगामुळे विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव तर मिळतच गेला, त्यासोबतच विद्यार्थ्यांच्या आकलनशक्ती मध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. आत्मविश्वास वाढला. यामुळे सध्याच्या स्पर्धात्मक युगात कोणत्याही क्षेत्रात जाताना जे धाडस गरजेचे असते ते धाडस विद्यार्थ्यांच्या मध्ये निर्माण झाले.

या संकल्पनेचे प्रत्यक्ष रुजवण करणारे रमेश बिरादार उदगीर येथील श्यामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी! अत्यंत हलाखीच्या कौटुंबिक परिस्थितीतून त्यांनी स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवले! एम एस सी ऍग्री शिक्षण घेऊन त्यांनी कृषी विभागाकडे कृषी अधिकारी वर्ग 2 या पदावर काम करायला सुरुवात केली.
वडीला कडून चारित्र्यसंपन्न आणि प्रामाणिकपणा हे गुण त्यांच्या अंगी वसा म्हणून आल्यामुळे आपण सरकारच्या दरबारात नोकरी करावी हे त्यांच्या स्वभावाला पटत नव्हते. शिवाय महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी सामाजिक चळवळीत पुढाकार घेऊन काम करायला सुरुवात केली होती. जे काम करायचे ते प्रामाणिकपणे करायचे हा स्वभाव असल्यामुळे सरकारी कामकाजाच्या पद्धतीत त्यांना रस वाटू लागला नाही. जवळपास 9 वर्षानंतर त्यांनी सरकारी नोकरी सोडली, आणि मित्रांना सोबत घेऊन मारुती स्टोकेम लिमिटेड हा मिश्र खत बनवण्याचा कारखाना सुरू केला. हातात पैसा नसताना देखील जवळपास 45 कोटी पर्यंत या कारखान्याची वार्षिक उलाढाल सुरू झाली. आर्थिक स्थैर्य आणि समाधान मिळाल्यानंतर गुणवत्ता व सेवा या तत्वावर कारखान्यात उत्तुंग भरारी घेतली. याच दरम्यान आपण काहीतरी नवे केले पाहिजे. हा विचार डोळ्यासमोर ठेवून शिक्षण क्षेत्राकडे वळले पाहिजे असे रमेश बिरादार यांना वाटू लागले. कारण त्यांनी स्वत:आत्मपरिक्षण केले. आपल्याकडे सर्व क्षमता असताना देखील आपण योग्य मार्गदर्शनाचा अभाव यामुळे सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकलो नाही. मग भावी पिढीला दिशा देण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातच काम करावे. असे ठरवून त्यांनी मग सी.बी एस.सी.ची मान्यता घेऊन लातूर मध्ये शाळा सुरू केली. पारंपारिक शिक्षण पद्धतीला फाटा देऊन विद्यार्थी घडवला पाहिजे, कारण पुस्तकी किडा बनलेल्या विद्यार्थ्याकडून फार मोठी कामगिरी होऊ शकेल याची खात्री नसते. विद्यार्थी हा जिज्ञासु, ज्ञानपिपासू आणि चौकस बनला पाहिजे. त्या दृष्टीने नवे नवे प्रयोग करावेत, सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असल्याने तंत्रज्ञानाला विद्यार्थ्यांच्या कलागुणांसोबत जिद्द, मेहनत आणि चिकाटीची जोड देऊन त्याला समाजामध्ये परिपूर्ण नागरिक घडवण्यासाठी काम सुरू केले. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास झाल्यानंतर तो आपोआपच समाज घडवण्यासाठी प्रयत्न करायला लागतो. आणि मग खर्‍या अर्थाने देशसेवा केल्याचे समाधानही मिळायला लागते. कारण शेवटी देश म्हणजे देशातील माणसे! हा विचार डोळ्यासमोर ठेवून माणसे घडली तर देश घडतो हा विचार डोळ्यासमोर ठेवून रमेश बिरादार यांनी काम करायला सुरुवात केली. कारण त्यांनी स्वतः शिक्षण घेताना आणि शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करताना दर्जा नियंत्रण अधिकारी म्हणून काम केलेले आहे. कृषी अधिकारी म्हणून काम केलेले आहे. आणि या सगळ्याच गोष्टीत मूळ दर्जा कसा नियंत्रित करावा? त्याचाही त्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास केला आहे.

विद्यापीठ स्तरावर आंतर विद्यापीठ, देश पातळीवर कबड्डी मध्ये त्यांनी आपले कौशल्य दाखवून दिले आहे. त्यामुळे आपण जी शाळा काढू त्या शाळेमध्ये कला, साहित्य, संस्कृती, विज्ञान, क्रीडा या विभागाला विशेष प्राधान्य द्यावे. जेणेकरून विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात आवड असेल त्या क्षेत्रात तो घडला जाईल. आणि नेमका त्या क्षेत्रातील तज्ञाकडून त्याला मार्गदर्शन मिळाल्यास निश्चितच तो त्या क्षेत्रातील सर्वोच्च पदापर्यंत पोहोचू शकेल! असा विश्‍वास त्यांना आहे. त्यामुळे त्यांनी हा नवीन प्रयोग सुरू केला आहे. साधारणपणे प्रत्येक वर्गातील पाच ते सहा विद्यार्थ्यांचा एक गट करून त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली. एका गटाने एखादा परिच्छेद वाचायचा, दुसऱ्याने त्या परिच्छेदाचे विश्लेषण करायचे, तिसऱ्या गटाने त्या परिच्छेदावर प्रश्नावली तयार करायची आणि चौथ्या गटाने त्या प्रश्नांची उत्तरे द्यायची. या दरम्यान झालेल्या एकूण प्रक्रियेच्या संदर्भात नंतर शिक्षकांनी विश्लेषण करून मार्गदर्शन करायचे. आणि हे सर्व करत असताना विद्यार्थ्याला आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारावर ऑडिओ व्हिडिओ च्या आधारे मार्गदर्शन करायचे. तसेच प्रत्येक विद्यार्थी गटाने स्वतंत्रपणे प्रत्येक धड्यावर प्रबंध तयार करायचा, आणि हे करत असताना त्या विद्यार्थ्याने हा प्रबंध कसा आहे? त्याचा उद्देश काय? हे सांगत असताना आवश्यक तेथे चित्रांचा आणि विश्लेषणाचा आधार घ्यायचा. शेवटी या प्रबंधाच्या संदर्भात त्याने आपले मत मांडायचे आणि मग हा प्रबंध वेगवेगळ्या गटाकडून तपासला जायचा. शेवटी विद्यार्थी गटाकडून तपासल्या गेलेल्या प्रबंधा मध्ये तो प्रबंध कसा आहे?तो आणखी उत्कृष्ट कसा ठरला असता? हे सांगण्यासाठी त्यामध्ये काय कमी आहे किंवा आणखीन काय हवे होते? याचे विश्लेषण मार्गदर्शक शिक्षणाकडून केले जाते. या सोबतच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेल्या शंका निरसन करण्यासाठी देखील शिक्षकांच्या मार्फत आणि तज्ञांच्या मार्फत स्पष्टीकरण केले जाते. प्रत्येक धड्यावर स्वतंत्रपणे परीक्षा पद्धती प्रमाणे परीक्षा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये परीक्षेबद्दल असलेली अनावश्यक भीती नष्ट होते. परिणामतः विद्यार्थी सहजपणे परीक्षेमध्ये उत्कृष्ट गुण घेऊन यशस्वी होतो. हे रमेश बिरादार यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.
शिक्षण क्षेत्रातील एक श्रद्धेय नाव म्हणजे “भगवान सिंग बयास गुरुजी” त्यांनी वेळोवेळी रमेश बिरादार यांच्या ग्लोबल नॉलेज पब्लिक स्कूल ला भेट देऊन अशी एखादी दर्जेदार शाळा उदगीरसाठी का काढत नाहीस? असे विचारल्यानंतर यासंदर्भात भरपूर विचार करून पुण्या-मुंबईला शाळा काढण्याचा विचार सोडून रमेश बिरादार यांनी आपल्या कर्मभूमीतच आपण कार्य करावे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उदगीर येथे जी.के. इंटरनॅशनल स्कूल सुरू करायचे ठरवले. त्यासाठी आवश्यक असणारी भव्य दिव्य अशी इमारत त्यांनी उभी केली. विद्यार्थ्यांना कोणत्याही भौतिक सुविधांची कमी जाणवू नये, याची बारकाईने नोंद घेत ते स्वतः प्रत्येक विभागांमध्ये जाऊन पाहणी करत असतात. तंत्रज्ञानाला प्राधान्य देऊन अध्ययन-अध्यापन उत्कृष्ट करावे यासाठी त्यांची चाललेली ही धडपड निश्चितच उल्लेखनीय आहे. त्यांचा हा प्रयोग उदगीरच्या शिक्षण पंढरीला गती देणारा तर आहेच आहे, उदगीर शहर आणि परिसरातील विद्यार्थ्यांना दिशा देणारा आणि त्यांचे भवितव्य घडवणारा देखील आहे! त्यांच्या या उपक्रमाला आणि शिक्षण क्षेत्रातील क्रांतिकारक वाटचालीला हार्दिक शुभेच्छा !

About The Author