डॉ.संदीपान जगदाळे यांना महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रमाधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार प्रदान

डॉ.संदीपान जगदाळे यांना महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रमाधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार प्रदान

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजना लातूर विभागीय समन्वयक व दयानंद कला महाविद्यालयातील प्रा.डॉ.संदीपान जगदाळे यांना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा योजनेचा राज्यस्तरीय ‘कार्यक्रमाधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार’ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी कुलगुरू डॉ.उज्वला चक्रदेव, राज्य संपर्क अधिकारी डॉ.प्रशांतकुमार वनंजे आदी उपस्थित होते. हा देखणा समारंभ एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई येथे संपन्न झाला.

१९९३ साली भूकंप झाला व चिंचोली जोगण या भूकंपग्रस्त गावात झालेल्या रासेयोच्या शिबिरापासून डॉ.जगदाळे यांनी सामाजिक उपक्रमात भाग घ्यायला सुरुवात केली. पुढे त्यांनी २०१३ पासून रासेयो कार्यक्रमाधिकारी म्हणून कार्य केले. तर २०१६ पासून रासेयो जिल्हा समन्वयक म्हणून कार्य केले.ते २३ जानेवारी २०२० पासून लातूर विभागीय समन्वयक म्हणून कार्य करीत आहे.कार्यक्रमाधिकारी असताना त्यांनी मळवटी, निवाडा,लखामपूर,महापुर,आनंदवाडी गौर या गावांत विशेष वार्षिक शिबिरात महत्वपूर्ण कार्य केले.या दत्तक गावात व दत्तकवस्ती रामगीरनगर येथे विविध सामाजिक उपक्रम राबविले.गऊळ जि.नांदेड,तुळजापूर व अलगरवाडी जि. लातूर येथे विभागीय स्तरावरील शिबिरांचे आयोजन केले.डॉ.जगदाळे यांनी व्याख्यानातून युवकांमध्ये राष्ट्रभक्तीची ज्योत प्रजवल्लीत केली. व्यसनमुक्तीचा संदेश दिला.स्वच्छ भारत- सुंदर भारत,मतदार जनजागृती, गोवर-रुबेला जनजागृती, एड्स जनजागृती, जलजागृती आदी रॅलीचे आयोजन केले.पोवाड्याच्या माध्यमातुन पर्यावरण,राष्ट्रीय एकात्मता,स्त्रीभ्रूणहत्या इ. विषयी प्रबोधन केले.कोरोना काळात पोवाडा व लोकगीतांच्या माध्यमातून जनजागृती केली. त्यांनी १५ वेळा रक्तदान करून स्वयंसेवकांना प्रोत्साहित केले.मुलीचा वाढदिवस साजरा न करता ‘जलयुक्त लातूर’ योजनेला अकरा हजार रुपयांची देणगी देऊन सामाजिक उपक्रमात योगदान दिले. या त्यांच्या कार्याची दखल घेऊन गुणवत्तेच्या आधारे महाराष्ट्र शासनाच्या वतीने हा +२ स्तरावरचा हा पुरस्कार त्यांना प्रदान केला. विशेष म्हणजे हा पुरस्कार प्रति वर्षी प्लस टू स्तरावर महाराष्ट्रातून एकाच कार्यक्रमाधिकाऱ्याल दिला जातो.

या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमन लाहोटी, उपाध्यक्ष अरविंद सोनवणे, रमेश राठी,शालेय समिती अध्यक्ष व संस्था उपाध्यक्ष ललितभाई शहा,कोषाध्यक्ष संजय बोरा, सरचिटणीस रमेश बियाणी, संयुक्त सचिव सुरेश जैन, प्र.कुलगुरू डॉ.जोगेंद्रसिंह बिसेन, डॉ.गणपत मोरे, सुधाकर तेलंग, दत्तात्रय मठपती, प्राचार्य डॉ.शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, पर्यवेक्षक डॉ.दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांनी अभिनंदन केले आहे.

About The Author