महात्मा गांधीजींचे विचार आचरणात आणण्याची गरज- डॉ.संतोष पाटील

महात्मा गांधीजींचे विचार आचरणात आणण्याची गरज- डॉ.संतोष पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : ” महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेतून सामाजिक चळवळीला प्रारंभ केला. तिथेच त्यांना वंशभेद आणि वर्णभेदाची जाणीव झाली. भारतात परतल्यानंतर त्यांनी भारतातील अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र आजही अनेक प्रश्‍न कायम असून महात्मा गांधींच्या स्वप्नातील भारत साकार करण्यासाठी गांधीजींच्या विचारांना आचरणात आणण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय सेवा योजनेचे लातूर जिल्हा समन्वयक प्रा. डॉ.संतोष पाटील यांनी केले.

येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित विद्यार्थी ऑनलाईन प्रबोधन पंधरवडा निमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विशेष व्याख्यानात डॉ.पाटील बोलत होते. आभासी तथा दूरदृश्य प्रणाली (झूम )च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. प्रारंभी राष्ट्रपिता महात्मा गांधींना अभिवादन करून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. पुढे बोलताना डॉ. संतोष पाटील म्हणाले की, महात्मा गांधींनी या देशालाच नव्हे तर संपूर्ण जगाला अहिंसा शिकविली त्याचबरोबर स्वच्छतेचे महत्व पटवून दिले. याकार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील म्हणाले की, महात्मा गांधींनी शारीरिक स्वच्छतेबरोबरच मानसिक स्वच्छतेचे ही महत्त्व सांगितले असून, आजच्या काळात खऱ्या अर्थाने महात्मा गांधीजींचे विचार आचरणात आणले तर कोरोना बरोबरच जगातली सगळी रोगराई दूर होईल.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. सतीश ससाणे यांनी केले. यावेळी आभासी तथा दूरदृश्य ( झुम ) प्रणालीच्या माध्यामातून प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येंने उपस्थित होते.

About The Author