आईने लेकरांना सकस आहारा सोबत चांगले विचार ही द्यावे – आप्पाराव कुलकर्णी

आईने लेकरांना सकस आहारा सोबत चांगले विचार ही द्यावे - आप्पाराव कुलकर्णी

अहमदपूर (गोविंद काळे) : प्रत्येक घरातील आईने आपल्या पाल्याला सकस आहारा सोबत चांगले विचार ही द्यावे म्हणजे त्यांचा सर्वांगीण विकास होतो. असे मत उद्घाटक आप्पाराव कुलकर्णी यांनी संत ज्ञानेश्वर विद्यालयात पालक मार्गदर्शन कार्यशाळेत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्था सचिव प्राचार्य रेखाताई तरडे – हाके होत्या तर उद्घाटक म्हणून मा. आप्पाराव कुलकर्णी लातूर,प्रमुख मार्गदर्शक म्हणून शिवशंकर राऊत व सुनिता नेलवाडकर उपस्थित होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून केंद्रप्रमूख श्री नंदकुमार कोनाले ,संस्था समन्वयक कुलदिप भैय्या हाके पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक नेलवाडकर सर सह पत्रकार बांधव उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत ज्ञानेश्वर माऊलीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच शाळेतील गीत मंचाने उपस्थितांचे शब्दसुमनी स्वागत केले. शाल, ग्रंथ व रोपटे देऊन उपस्थितांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चित्र प्रदर्शन दालनाचे उद्घाटन करण्यात आले. आप्पाराव कुलकर्णी पुढे बोलताना म्हणाले की, पाल्यांना कसे घडवावे, बालक म्हणजे कल्पतरू आहेत.आईवडिलांनी मुलांना जीवन शिक्षण द्यावे. संतती हीच खरी संपत्ती आहे. या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. शिवशंकर राऊत यांनी अभ्यासाचे तंत्र आणि मंत्र तर सुनिता नेलवाडकर यांनी मुला-मुलींच्या सर्वांगीण विकासात आईच भूमिका या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले.

रेखाताई तरडे अध्यक्षीय समारोप प्रसंगी म्हणाल्या की, शाळेने पालकांची एक दिवशीय कार्यशाळा घेऊन नवीन आदर्श निर्माण केला आहे.यावेळी पालकांनी पाल्यांच्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. या पालक मार्गदर्शन कार्यशाळेस खूप मोठ्या संख्येने महिला पालक उपस्थित होते. कार्यशाळेचे प्रास्ताविक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन संगीता आबंदे व सतीश साबणे यांनी केले तर आभार मुख्याध्यापक उद्धव शृंगारे यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!