भीमजयंती बहुजनांनी साजरी करावी – माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील

भीमजयंती बहुजनांनी साजरी करावी - माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील मौजे मोघा येथे विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. सकाळच्या सत्रामध्ये पंचशील ध्वजारोहण व अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री तथा अहमदपूर चाकूर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार विनायकराव पाटील यांच्या शुभहस्ते पंचशील ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर जहिर अभिवादन सभा घेण्यात आली. या अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राज्य सचिव तथा चळवळीतील ज्येष्ठ नेते बाबासाहेब कांबळे हे होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही फक्त बौद्धांनीच नाही तर सबंध बहुजनांनी साजरी करावी कारण बाबासाहेबांचे कार्य हे तमाम मानवजातीसाठी होते, बाबासाहेबांचे संविधान या देशातल्या शोषित, पीडित, वंचित घटकाच्या उत्थानासाठी आहे, बाबासाहेब हे युगपुरुष होते असे मत विनायकराव पाटील यांनी मांडले. विद्रोही कवी राजेंद्र कांबळे यांनी जयंतीचं बदलतं स्वरूप व भविष्यातील संभाव्य धोके, बौद्ध सांस्कृतीचे जतन काळाची गरज याविषयी गंभीर व विचार करायला भाग पाडणारे भाष्य केले. यावेळी विचारमंचावर आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथ जोंधळे, सोमेश्वर कदम, शिवाजी जंगापल्ले, डॉ. सिद्धार्थ सुर्यवंशी, राजु खंदाडे, बाबासाहेब वाघमारे, पद्माकर कांबळे,विनय ढवळे, शिवाजी गायकवाड,त्रिशरण मोहगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन माजी प्राचार्य तुकाराम हारगीले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संभाजी कांबळे व जयंती उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!