दूषीत पाण्यासाठी लातूरकरांना भविष्यात तीव्र आंदोलन उभारावे लागेल – माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर
लातूर (प्रतिनिधी) : लातूरच्या दूषीत पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. गेल्या दीड महिन्यापासून लातूरकरांना पिवळ्या व गढूळ दूषित पाण्याचा पुरवठा केला जात आहे. याबाबत लातूरचे पालकमंत्री व महापौर पाणी पिण्यायोग्य असल्याचा दावा करत असले तरी समस्त लातूरकरांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा प्रकार प्रशासनाकडून होत आहे. त्यामुळे लातूरकरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा अन्यथा या दूषीत पाण्यासाठी भविष्यात तीव्र आंदोलन उभारावे लागेल असा ईशारा भाजपा नेते तथा भाजपा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी दिला.
यावेळी ते भारतीय जनता पार्टीच्यावतीने लातूरकरांना होणार्या दूषीत पाणी पुरवठ्याबाबत महानगरपालीकेसमोरील निदर्शने आंदोलनात बोलत होते. यावेळी माजी कामगार कल्याणमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.सुधाकरराव श्रृंगारे, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे, भाजपा शहर सचिव मनिष बंडेवार, भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव प्रेरणाताई होणराव, अॅड.गणेश गोमचाळे, भाजपा युवा मोर्चाचे शहर जिल्हा अध्यक्ष अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, रवि सुडे, मनपाचे गटनेते शैलेश गोजमगुंडे,व्यंकट पन्हाळे, ज्योतीराम चिवडे, युवा मोर्चाचे गजेंद्र बोकण आदी मान्यवर उपस्थीत होते.
पुढे बोलताना माजी आ.कव्हेकर म्हणाले केंद्र सरकारच्या निधीतून लातूर, औरंगाबाद व नागपूरसाठी तीन सुपरस्पेशालीटी हॉस्पीटल उभारण्यात आले परंतू या हॉस्पीटलचे खाजगीकरण करण्याचा डाव विद्यमान राज्याचे वैद्यकीय व सांस्कृतीक मंत्री तथा पालकमंत्री अमित देशमुख यांनी घातलेला आहे. हे हॉस्पीटल सर्वसामान्याच्या पैशातून उभारण्यात आले असल्यामुळे त्याचे खाजगीकरण करण्यात येेऊ नये. उजनीच्या पाण्यासाठी 18 वर्षापूर्वी 24 टीएमसी पाणी लातूरला आणण्याच्या कामाचे भूमीपुजन करण्यात आले परंतू अद्यापपर्यंत एक थेंबही पाणी आलेले नाही. विद्यमान पालकमंत्र्यानेही निवडून आल्यानंतर दोन महिन्यात उजनीचे पाणी आणू अन्यथा पदाचा राजीनामा देऊ असे जाहीर करूनही लातूरला पाणी आणण्यात ते पूर्णपणे अपयशी ठरलेले आहेत. त्यामुळे त्यांनी नैतीक जबाबदारी स्वीकारून पदाचा राजीनामा द्यावा असे अवाहनही त्यांनी यावेळी बोलताना केले. 8 वर्षे मुख्यमंत्री 20-25 वर्षे मंत्री राहूनही लातूरला एकही उद्योग सत्ताधार्यांना आनता आलेला नाही उलट तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूरसाठी बोगीचा कारखाना आणला असून यातून अनेक बेरोजगारांना नोकरीची संधी मिळणार आहे. तसेच माजी मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या काळातच 25 हजार कोटीचा वॉटरग्रीड प्रकल्प मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी आणण्याचे काम केले परंतू त्यालाही खोडा घालण्याचे काम विद्यमान महाविकास आघाडी सरकारने केले आहे. परंतू मराठवाडा व लातूर करावरील अन्यायासाठी आपण सदैव उभे राहू असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
निदर्शने आंदोलनाच्याप्रारंभी शहरातील गांधी चौकातून महानगरपालिकेवर हजारो नागरीकांच्या उपस्थीतीत दूषीत पाण्याच्या बाटल्या घेउन मनपा प्रशासनाच्या विरोधात घोषणा देत दूषित पाण्याबाबत निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी माजी कामगार कल्याणमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, खा.सुधाकरराव श्रृंगारे, भाजपाचे माजी शहर जिल्हा अध्यक्ष शैलेश लाहोटी, भाजपा शहर जिल्हा अध्यक्ष गुरूनाथ मगे यांनी ही दूषित पाण्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करत सुपर स्पेशालीटी हॉस्पीटलचे खाजगी करण झाले तर मंत्र्यानाही जिल्ह्यात फिरू देणार नाही असा ईशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला. शेवटी उपस्थीत सर्व लातूरकरांचे आभार भाजपा शहर जिल्हा सरचिटणीस मनिष बंडेवार यांनी मानले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्याची मोठ्या संख्यने उपस्थिती होती.