देशाला सर्वोच्च पातळीवर पोहोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता – खा.डॉ.विनय सहस्त्रबुद्धे
लातुर (प्रतिनिधी) : देशाला सर्वोच्च पातळीवर पोचविण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्यकता असून यासाठी देशातील प्रत्येक राजकिय व्यक्तींनी अभिनिवेश न बाळगता राष्ट्र हिताला प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन खा डॉ विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले.ते दयानंद शिक्षण संस्था व विश्वकल्याण विचारमंच व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित युवक व बुद्धिवंत नागरिकांसाठी आयोजित केलेल्या 2012 ते 2022 या दशकातील राजकारण या विषयावर व्याख्यान देताना बोलत होते.
पुढे ते म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्ती पासून भारतीय राजकारणात ब्रिटीशांचे सावट दिसून येत होते. चालू दशकापासून मात्र भारतीय संस्कृती संवर्धन, योग जनतांत्रिकिकरण, पद्म पुरस्कारांचे वितरण, 370 वे कलम, याबरोबरच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्वप्नातील आर्थिक लोकशाही ही संकल्पना या दशकात राबवण्याचा कसोशीने प्रयत्न चालू आहे.राष्ट्रनिर्माण करण्यात केवळ राजकीय इच्छाशक्ती असून चालणार नाही तर लोकसहभाग तेवढाच महत्वाचा आहे.यालाही या दशकात महत्व देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय पद्मभूषण डॉ अशोकराव कुकडे काका यांनी केले अतिथींचे स्वागत दयानंद शिक्षण संस्थेचे अध्यक्ष लक्ष्मीरमण लाहोटी सरचिटणीस रमेश बियाणी प्राचार्य डॉ शिवाजी गायकवाड यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.संदीपान जगदाळे यांनी केले. दयानंद कला महाविद्यालयातील संगीत विभागाच्यावतीने स्वागत गीत सादर करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी उपप्राचार्य अनिलकुमार माळी पर्यवेक्षक डॉ. दिलीप नागरगोजे, कार्यालयीन अधीक्षक नवनाथ भालेराव यांनी परिश्रम घेतले.
यावेळी खा. सुधाकर शृंगारे, आ. संभाजी पाटील निलंगेकर, आ. अभिमन्यु पवार, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी खासदार गोपाळराव पाटील यांच्यासह शहरातील प्रतिष्ठित नागरिक, प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.