अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयास तीन सुवर्णपदके
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड अंतर्गत गुणवत्तेची अखंड परंपरा कायम ठेवत उच्चशिक्षणात फुले पॅटर्न निर्माण केला आहे . उन्हाळी २०२१ च्या परीक्षेत कला शाखेत विद्यापीठातून प्रथम येण्याचा मान तसेच राज्यशास्त्र विषयात दोन सुवर्णपदक तर संस्कृत विषयात एक सुवर्णपदक पटकावून शैक्षणिक क्षेत्रातील आपला दबदबा कायम ठेवला आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सन २००९ पासून अखंडित पणे गुणवत्तेचा आलेख उंचावत गुणवत्तेत फुले महाविद्यालयाचा दबदबा कायम ठेवला आहे. उन्हाळी २०२१ च्या परीक्षेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने नुकतीच गुणवत्ता यादी जाहीर केली असून त्यात बी.ए . शाखेतून कु. चव्हाण पूजा गोपीचंद ही विद्यार्थिनी सर्वप्रथम आली असून राज्यशास्त्र विषयात विद्यापीठात प्रथम येण्याची मानकरी ठरली आहे. तिला प्राचार्य द.रा. कुलकर्णी यांच्या तर्फे सुवर्णपदक तसेच प्रा. उत्तम दिपाजी सूर्यवंशी ‘तोरणा ‘ यांच्यावतीने स्वातंत्र्यसेनानी दिपाजी पाटील सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. तसेच संस्कृत विषयांमध्ये कु. मलकापुरे रेणुका पुंडलिक या विद्यार्थिनीने विद्यापीठातून प्रथम क्रमांक पटकावून डॉ. गोपाळराव विठ्ठलराव पाटील अध्यक्ष, शिव छत्रपती शिक्षण संस्था लातूर यांच्या वतीने देण्यात येणारा प्रयागबाई विठ्ठलराव पाटील सुवर्णपदक प्राप्त केले आहे.
याबद्दल कु.चव्हाण पूजा गोपीचंद व कु. मलकापुरे रेणुका पुंडलिक या गुणवंत विद्यार्थीनीचे किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, उपाध्यक्ष अशोकराव पाटील राजूरकर, सचिव ज्ञानदेव झोडगे, सहसचिव माधवराव पाटील, कोषाध्यक्ष नामदेवराव चामले, ज्येष्ठ संचालक गुंडेराव पाटील, पी.टी. शिंदे , प्रा. शिवाजीराव मुळे, पृथ्वीराज पाटील एकंबेकर, अजित पाटील तोंडचिरकर, विशाल पाटील शिरोळकर, प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत जाधव यांच्यासह महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.