भारतीय अर्थशास्त्रामध्ये अखिल मानवतेचा मूलभूत विचार – प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे

भारतीय अर्थशास्त्रामध्ये अखिल मानवतेचा मूलभूत विचार - प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे

अहमदपूर (गोविंद काळे) : प्राचीन काळामध्ये कौटिल्याने अर्थशास्त्राचा विचार मांडून भारताची आर्थिक परंपरा सिद्ध केली आहे. आजही संपूर्ण जगात मानवतेचा मूलभूत विचार फक्त भारतीय अर्थशास्त्रामध्ये आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे नियोजन मंडळाचे माजी सदस्य तथा औरंगाबाद येथील प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सर्जेराव ठोंबरे यांनी केले.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड, ग्लोबल संस्कृत मंच व किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीर, द्वारा संचलित महात्मा फुले महाविद्यालय, अहमदपूरच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ” भारतीय आर्थिक विचारांची जागतिक प्रासंगिकता ” या विषयावरील एक दिवसीय अंतरविद्याशाखीय आंतरराष्ट्रीय ई – चर्चासत्रात प्राचार्य डॉ.ठोंबरे हे बीज भाषक म्हणून बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते. तर विशेष निमंत्रित म्हणून किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर, सचिव ज्ञानदेव झोडगे गुरुजी, कार्यकारी संचालक पृथ्वीराज अशोकराव पाटील एकंबेकर यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे, विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. विकास सुकाळे, शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथील प्राचार्य डॉ. के.के. पाटील, डेक्कन कॉलेज विद्यापीठाच्या प्र. कुलगुरु डॉ. जयश्री साठे, सिद्धेश्वर महाविद्यालय माजलगाव येथील प्राचार्य डॉ. महेश देशमुख हे मान्यवर उपस्थित होते. तर उद्घाटक म्हणून न्यू जर्सी अमेरिका येथील एन. आय. सी. रिसर्च फाउंडेशनचे डायरेक्टर डॉ. अष्ट मिश्रा हे उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना प्राचार्य डॉ ठोंबरे म्हणाले की, जगात आज भांडवलशाहीने धुमाकूळ घातला आहे . भांडवलशाहीचा एकच उद्देश असतो तो म्हणजे नफा कमावने पण हे करत असतांना नीतिमत्ता पाळली जात नाही. मात्र भारतात संत तुकारामांनी जोडूनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी असा व्यवहारातही नैतिकता जपण्याचा संदेश दिला आहे. आणि हाच भारतीय अर्थशास्त्राचा विचार आहे, जगाने हा विचार स्वीकारला आहे. असेही ते यावेळी म्हणाले.

त्यानंतर झालेल्या शोधनिबंध वाचन सत्राचे अध्यक्षपद मुंबई येथील सेंट झेवियर्स कॉलेजच्या प्रा. डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी भूषवले. यावेळी डॉ. रजेका खान, डॉ. मोहन बंडे, डॉ. दिगंबर भोसले, डॉ. राजकुमार जोशी यांनी शोध निबंधांचे वाचन केले. चर्चासत्राच्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरणाच्या या काळात भारतीय आर्थिक विचारवंत आणि संशोधक, अभ्यासकांची जबाबदारी वाढली असून, जगाला आदर्श ठरेल अशी नवी मांडणी करून त्यांनी भारतीय अर्थशास्त्राची विचारधारा विकसित केली पाहिजे असेही ते म्हणाले.

या आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांचा परिचय आंतरराष्ट्रीय कार्यशाळेचे चर्चासत्राचे संयोजक उपप्राचार्य तथा अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रो. डॉ. दुर्गादास चौधरी यांनी केले तर सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. आतिश आकडे यांनी केले व हिंदी विभागाचे प्राध्यापक डॉ. पांडुरंग चिलगर यांनी आभार मानले. या आभासी आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात आभासी पद्धतीने जवळपास दीडशेहून अभ्यासक, संशोधक व प्राध्यापक उपस्थित होते.

About The Author