बोगस बियाणे विकून शेतकऱ्याला लुबाडणाऱ्यांची दिंडी काढणार – लक्ष्मण फुलारी
उदगीर (प्रतिनिधी) : पेरणीच्या तयारीचे दिवस आले आहेत. शेतकरी आपापल्या पद्धतीने कामाला लागला आहे. मागील काही वर्षाचा अनुभव पाहिल्यास लातूर जिल्ह्यात बोगस बियाणे विक्रीवर मोठ्या प्रमाणात निर्बंध घालणे गरजेचे आहे. कारण बोगस बियाणे विकून शेतकऱ्याला लुबाडणारे मंडळी वाढली आहे. त्यामुळे प्रशासनाने उदगीर परिसरातील बाजारात बोगस बियाणे विक्रीच होणार नाही, याची काळजी घ्यावी. आणि ज्या कंपनीचे बियाणे उगवले नाही. अशा कंपनीवर जिल्हा प्रशासनाने तात्काळ कारवाई करून शेतकऱ्याला अर्थसहाय्य मिळवून द्यावे. अशी मागणी करणारे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव फुलारी भालके यांनी दिले आहे.
वास्तविक पाहता शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहायला कुणाला वेळ नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागत आहेत, त्याचे नियोजन सुरू आहे. त्या दृष्टीने सर्व राजकीय पक्षाचे लक्ष जिल्हा परिषदेचे गट, पंचायत समितीचे गण, याकडे लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना बोगस बियाणे विकून गडगंज होणारे व्यापारी मालामाल होत आहेत, हे थांबले पाहिजे. अशी ही आग्रही मागणी लक्ष्मणराव फुलारी यांनी केली आहे. लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांच्याशी प्रत्यक्ष भेटून या संदर्भात योग्य तो निर्णय घ्यायला शासनाला भाग पाडू. असेही आश्वासन प्रसिद्धिमाध्यमांशी बोलताना लक्ष्मणराव फुलारी भालके यांनी दिले आहे.