राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक निवडणुका स्वबळावर लढणार – महादेव जानकर

राष्ट्रीय समाज पक्ष स्थानिक निवडणुका स्वबळावर लढणार - महादेव जानकर

उदगीर (अँड.एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने स्वतंत्रपणे लढल्या जातील. त्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेवजी जानकर यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत दिला. उदगीर तालुक्यातील लोणी येथील राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यालयात पक्ष संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी आणि प्रसिद्धी माध्यमाचे काही प्रतिनिधी यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत लातूर जिल्ह्याच्या निवडणुकांची जबाबदारी पक्षाचे जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके यांच्यावर सोपवण्यात आली.
या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने लातूर जिल्हा परिषदेची निवडणूक, जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीच्या निवडणुका, जिल्ह्यातील सर्व नगर पालिकेच्या निवडणुका या सर्व स्वबळावर लढणार असून यासाठी कार्यकर्त्यांनी तयारीला लागावे. या तयारीसाठी काही आवश्यकता असल्यास मार्गदर्शन घ्यावे. असेही आवाहन करण्यात आले. बैठकीच्या प्रारंभी जिल्हा अध्यक्ष नागनाथ बोडके यांनी प्रास्ताविक करून राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेवजी जानकर यांच्या भूमिकेच्या संदर्भात माहिती दिली. त्याला सर्व कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवून उत्साहाने संमती दर्शविली.
जानकर साहेब बोलत असताना सर्व कार्यकर्त्यांनी आपण जबाबदारी पेलण्यास सज्ज आहोत, आणि जिल्हाध्यक्ष नागनाथ बोडके हे जिल्हाभर फिरून तयारी पूर्ण करून घेतील. असा विश्वासही दाखवला. या बैठकीसाठी राष्ट्रीय समाज पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष प्रा विष्णू गोरे हेही उपस्थित होते. तसेच आनंद जीवने, परमेश्वर सोमवंशी, राज गायकवाड !उद्धव गायकवाड, धनराज जाधव, निवृत्ती बाजीगर, राजकुमार साताळे, गोविंद साताळे, रवींद्र साताळे, माधव सताळे, पांडुरंग मोरे ,सुनील सुरणर, रामनगर श्रीकृष्ण साताळे, अमोल सताळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या बैठकीच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक रामराव बोडके हे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक साताळे यांनी तर प्रास्ताविक निवृत्ती बाजीगर यांनी केले. आभार प्रदर्शन राज गायकवाड यांनी मानले.

About The Author